Ranji Trophy: कर्नाटकला दुसऱ्या डावात फलंदाजी आलीच नाही तरी जम्मू काश्मीरला जेतेपद कसं? जाणून घ्या

रणजी ट्रॉफी स्पर्धेत जम्मू काश्मीरने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. 67 वर्षात पहिल्यांदाच जम्मू काश्मीरने जेतेपदावर नाव कोरलं आहे. पण कर्नाटकची दुसऱ्या डावात फलंदाजी आलीच नाही. मग जम्मू काश्मीर विजयी कसं ते जाणून घ्या

Ranji Trophy: कर्नाटकला दुसऱ्या डावात फलंदाजी आलीच नाही तरी जम्मू काश्मीरला जेतेपद कसं? जाणून घ्या
कर्नाटकची दुसऱ्या डावात फलंदाजी आलीच नाही तरी जम्मू काश्मीरला जेतेपद कसं? जाणून घ्या
Image Credit source: BCCI/Viral Video Grab
| Updated on: Feb 28, 2026 | 3:33 PM

रणजी ट्रॉफी 2025-26 स्पर्धेच्या अंतिम फेरीत जम्मू काश्मीरने बाजी मारली आणि जेतेपदावर नाव कोरलं. नाणेफेकीचा कौल हा जम्मू काश्मीरच्या बाजूने लागला होता. कर्णधार पारस डोगराने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय पथ्यावर पडला असंच म्हणावं लागेल. कारण जम्मू काश्मीरने पहिल्या डावात मोठी धावसंख्या रचली. जम्मू काश्मीरने सर्व गडी गमवून 584 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना कर्नाटकचा संघ 293 धावांपर्यंत मजल मारू शकला. त्यामुळे जम्मू काश्मीरला पहिल्या डावात 291 धावांची मजबूत आघाडी मिळाली. या धावांच्या पुढे खेळताना जम्मू काश्मीरने 4 विकेट गमवून 342 धावांपर्यंत मजल मारली. पाचव्या दिवसापर्यंत हा खेळ सुरू होता. तसेच कर्नाटकला फलंदाजी देण्याचा कोणताही मानस दिसत नव्हता.

जम्मू काश्मीरच्या साहिल लोत्रा आणि कामरान इकबाल ही जोडी जमली होती. साहिल लोत्रा नाबाद 101 आणि कामरान इकबाल नाबाद 160 धावांवर खेळत होता. त्यामुळे आता पुढे काय निकाल लागेल असं वाटत नव्हतं. कारण पहिल्या डावातील 291 धावांची बेरीज करता जम्मू काश्मीरकडे 633 धावांची आघाडी होती. त्यामुळे या धावा गाठणं उर्वरित तासात काही शक्य नव्हतं. अखेर हा सामना ड्रॉ करण्याचा निर्णय घेतला गेला. पण असं असताना जम्मू काश्मीरला विजयी घोषित करण्यात आलं. सामना ड्रॉ झाला असताना असं का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर त्या मागचं गणित पुढे समजून घ्या.

…म्हणून जम्मू काश्मीरला मिळालं जेतेपद

रणजी ट्रॉफी स्पर्धेत पहिल्या डावातील आघाडीवर विजयाचं गणित मांडलं जातं. पहिल्या डावात जम्मू काश्मीरने 584 धावा केल्या होत्या. त्या प्रत्युत्तरात कर्नाटकचा डाव 293 धावांवर आटोपला. जम्मू काश्मीर पहिल्या डावात 291 धावांनी आघाडीवर होता. त्यामुळे जम्मू काश्मीरला विजयी घोषित करण्यात आलं. जर कर्नाटकचा संघ पहिल्या डावात आघाडीवर असता तर कर्नाटकला विजयाची चव चाखता आली असती. पण या सामन्यातील पहिल्या डावात जम्मू काश्मीरचा संघ सरस ठरला. त्यामुळे जेतेपद हे जम्मू काश्मीरला मिळालं.

Follow Us