आयपीएल स्पर्धेत पंचांवरही पडतो पैशांचा पाऊस, जाणून घ्या एका सामन्याचं किती मानधन मिळतं?

आयपीएल स्पर्धा म्हंटलं तर लिलाव आणि त्यात खेळाडूंवर लागणारी कोट्यवधींची बोली समोर येते. पण असं फक्त खेळाडूंच्या बाबतीत होतं असं नाही. तर मैदानातील पंचही चांगली कमाई करतात. चला जाणून घेऊयात पंचांना एका सामन्यासाठी किती फी मिळते ते..

आयपीएल स्पर्धेत पंचांवरही पडतो पैशांचा पाऊस, जाणून घ्या एका सामन्याचं किती मानधन मिळतं?
आयपीएल स्पर्धेत पंचांवरही पडतो पैशांचा पाऊस, जाणून घ्या एका सामन्याचं किती मानधन मिळतं?
Image Credit source: Getty Images
| Updated on: Mar 18, 2026 | 9:36 PM

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल स्पर्धा ही जगातील सर्वात श्रीमंत लीगपैकी एक आहे. या स्पर्धेत खेळाडूंवर अक्षरश: पैशांचा पाऊस पडतो असं म्हंटलं तर वावगं ठरणार आहे. इतकंच काय तर ही स्पर्धा जगभरात पाहिली जाते. या स्पर्धेत आतापर्यंत खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लागली आहे. आतापर्यंतचे अनेक विक्रम मोडीत काढले आहे. लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत हा या स्पर्धेतील सर्वात महागडा खेळाडू आहे. पण खेळाडूच नाही तर मैदानातील पंचांची कमाई देखील चांगली आहे. मैदानात तासंतास उभ्या असलेल्या पंचांना त्यांच्या मेहनतीचं चांगलं फळ मिळतं. पंचांच्या हातात सामन्यांचा निकाल असतो, त्यामुळे पंच कशी भूमिका घेतात याकडे लक्ष असते. हायप्रेशर सामन्यात तर ही भूमिका आणखी महत्त्वाची ठरते. असं असलं तर पंचांना किती रक्कम मिळत असावी? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. जर तुम्हालाही असाच प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर पुढे आहे.

पंचांना किती फी मिळते?

मिडिया रिपोर्टनुसार, आयपीएलमधील मैदानात पंचगिरी करणाऱ्या पंचांना प्रत्येक सामन्यासाठी 3 लाख रूपये मिळतात. तर तिसरा पंच आणि चौथ्या पंचांना प्रत्येक सामन्यासाठी 2 लाख रुपयांचं मानधन मिळतं. काही रिपोर्टनुसार, एलीट म्हणजेच आयसीसी पॅनेल सदस्यांना किंवा अनुभवी पंचांना 3.7 लाख रूपये प्रति सामना मानधन मिळतं. तर डेव्हलपमेंट पंचांना प्रत्येक सामन्यासाठी 60 हजार रूपये मिळतात. दुसरीकडे, प्लेऑफ आणि अंतिम सामन्यात पंचगिरी करणाऱ्या पंचांना बोनस आणि अतिरिक्त रक्कम मिळते. एलीट पंचांना या सामन्यासाठी 5 ते 8 लाखांपर्यंत बोनस मिळू शकतो. इतकंच काय तर ही रक्कम अधिक असू शकते. एका पर्वात एक पंच 12 ते 15 सामन्यात पंचगिरी करतात. त्यामुळे त्याने 25 ते 40 लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक मिळतात.

पंचांना सिझन रिटेनर म्हणून जवळपास 7.33 लाखांची एक फिक्स्ड रक्कमही मिळते. यात ट्रॅव्हेल, स्टे आणि इतर भत्तेही असतात. जर आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांच्या मानधनाची तुलना केली तर खूप फरक दिसून येतो. आयपीएलमध्ये पंचगिरी करणाऱ्या पंचांना तुलनेने अधिक रक्कम मिळते. ही रक्कम अडीच पट अधिक असते. कारण टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी पंचांना 1.13 आणि 1.25 लाख मिळतात.

Follow Us