
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेला 9 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. यंदा हे स्पर्धेचं चौथं पर्व आहे. महिनाभर क्रीडाप्रेमींना स्पर्धेचा आनंद लुटता येणार आहे. 28 दिवसात एकूण 22 सामने खेळले जाणार असून चाहत्यांचं या स्पर्धेत चांगलंच मनोरंजन होणार यात काही शंका नाही. पण तुम्हाला माहिती आहे का? पुरूष क्रिकेटच्या तुलनेत महिलांचं क्रिकेट थोडं वेगळं असतं. सर्व नियम सारखेच असतात यात काही दुमत नाही. पण महिला क्रिकेटमध्ये वापरली जाणारी बॅट आणि चेंडूच्या वजनात फरक असतो. इतकंच काय तर मैदानाचा परीघ देखील पुरूषांच्या तुलनेत वेगळा असतो. त्यामुळे महिला आणि पुरूष क्रिकेट सारखं वाटत असतं तरी हा थोडासा फरक मात्र आहे. चला जाणून घेऊयात सविस्तर काय ते…
महिला आणि पुरूषांच्या बॅटमध्ये खूप फरक असतो. पुरूषांच्या बॅटचं वज 1134 ग्रॅम ते 1360 ग्रॅमपर्यंत असते. या तुलनेत महिलांची बॅट हलकी असते. त्याचं वजन 1049 ग्रॅम ते 1190 ग्रॅम असते. महिलांची ताकद आणि बॅट फिरवण्याची ताकद पाहता बॅट वजनाने हलकी ठेवली आहे. पुरूषांची बॅट लांब आणि थोडी रूंद असते. तर बॅटचा दांडा हा 36-35मीमी लांब असतो. महिलांचं हँडल 34 ते 36 मीमी असते. महिला क्रिकेटपटू शॉर्ट हँडल किंवा हिरो साइज बॅटचा वापर करतात. बॅटची लांबी खेळाडूंच्या उंचीवरही अवलंबून असते.
महिला क्रिकेटमध्ये वापरला जाणारा चेंडू पुरूषांच्या तुलनेने हलका असतो. महिला क्रिकेटमध्ये 140 ते 151 ग्राम वजनाचा चेंडू वापरला जातो. तर पुरूषांच्या क्रिकेटमध्ये 155 ते 165 ग्राम वजनाचा चेंडू वापरला जातो. दोन्ही क्रिकेटमध्ये चेंडूंची साईज सारखीच असते. पण महिलांची ताकद आणि स्पीड लक्षात घेत चेंडू त्या तुलनेनं हलका केला आहे. यामुळे जास्तीचा स्विंग मिळतो.
महिला क्रिकेटमध्ये पुरूष क्रिकेटच्या तुलनेत परीघ लहान असतं. आयसीसी नियमानुसार, महिला क्रिकेटमध्ये मैदानातील परीघ हे 23 मीटरवर असतं. तर पुरूषांचं परीघ हे 27.43 मीटरवर असते. महिलांच्या ताकदीचा अंदाज घेऊन हे परीघ कमी केलं आहे. परीघ छोटं असल्याने महिला क्रिकेट पॉवरप्लेमध्ये जास्तीची जोखिम घेऊ शकतात.