
श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान यांच्यात झालेली 3 सामन्यांची टी 20i मालिका 1-1 ने बरोबरीत राहिली. या मालिकेतील पहिला सामना पाकिस्तानने जिंकला. त्यानंतर दुसरा सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला. तर श्रीलंकेने तिसरा आणि निर्णायक सामना जिंकून मालिका 1-1 ने बरोबरीत सोडवली. श्रीलंकेविरुद्ध मालिका बरोबरीत सोडवल्यानंतर आता पाकिस्तान आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेआधी ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी 20I मालिका खेळणार आहे. या मालिकेत एकूण 3 टी 20I सामने खेळवण्यात येणार आहेत. पीसीबी अर्थात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बुधवारी 14 जानेवारीला या मालिकेचं वेळापत्रक जाहीर केलंय. आयसीसीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.
ऑस्ट्रेलिया या 3 सामन्यांच्या मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेला 7 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. तर पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 29 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान टी 20i सीरिज खेळवण्यात येणार आहे. हे तिन्ही सामने एकाच मैदानात खेळवण्यात येणार आहेत. लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये या सामन्यांचा थरार रंगणार आहे. तसेच या सामन्यांना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. ऑस्ट्रेलिया अवघ्या 1 दिवसआधी अर्थात 28 जानेवारीला पाकिस्तानमध्ये पोहचणार आहे.
आगामी वर्ल्ड कप स्पर्धेआधी दोन्ही संघांसाठी ही टी 20I मालिका अनेक दृष्टीने महत्त्वाची आहे. पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतील सामने सहयजमान असलेल्या श्रीलंकेत खेळणार आहे. पाकिस्तानने यजमान संघाला मालिका जिंकण्यापासून रोखलं. पाकिस्तानला हा अनुभव वर्ल्ड कप स्पर्धेत कामी येईल. आता त्यानंतर पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांना या मालिकेतून अनेक गोष्टी पडताळून पाहण्याची संधी आहे.
पहिला सामना, 29 जानेवारी, गद्दाफी स्टेडियम
दुसरा सामना, 31 जानेवारी, गद्दाफी स्टेडियम
तिसरा सामना, 1 फेब्रुवारी, गद्दाफी स्टेडियम
पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया टी 20i मालिका
Pakistan lock in dates for Australia series ahead of #T20WorldCup 📅#PAKvAUS | Read more ⬇️https://t.co/B5dXgLMr4B
— ICC (@ICC) January 14, 2026
तसेच दोन्ही संघांच्या प्रमुख खेळाडूंना दुखापत झालीय. ते खेळाडू काही आठवड्यांपासून दुखापतीतून बाहेर येण्यासाठी आवश्यक ते सर्व काही करत आहेत. ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूड, पॅट कमिन्स आणि टीम डेव्हिड हे दुखापतीतून सावरत आहेत. तर पाकिस्तानचा प्रमुख वेगवान गोलंदाज शाहीन शाह अफ्रिदी यालाही दुखापत झालीय. त्यामुळे हे दुखापतग्रस्त खेळाडू या मालिकेपर्यंत फिट होणार का? हे पाहणं आगामी टी 20I वर्ल्ड कपच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरणार आहे.