
मुळचा गुजरातचा असणाऱ्या मोनांक पटेल याने आपल्या नेतृत्वात टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत यजमान यूएसएला 4 पैकी 2 सामन्यात विजय मिळवून दिला. यूएसएने कॅनडा आणि पाकिस्तान यांचा पराभव करत सुपर 8 मध्ये धडक मारली. मात्र त्यानंतर यूएसएला पुढील फेरीत धडक मारता आली नाही. मात्र यूएसएने आपल्या पहिल्याच टी 20 वर्ल्ड कपमध्ये आपल्या कामगिरीने क्रिकेट विश्वाला दखल घ्यायला भाग पाडलं. त्यानंतर आता आयसीसी वर्ल्ड कप लीग 2 या स्पर्धेतील 20 व्या सामन्यात कॅनडा विरुद्ध यूएसए आमेनसामने आहेत. यूएसएचा कॅप्टन मोनांक पटेल याने या सामन्यात कॅनडा विरुद्ध खणखणीत शतक ठोकलंय. मोनांक पटेल याचं हे एकदिवसीय कारकीर्दीतील तिसरं शतक ठरलं आहे.
कॅप्टन आणि विकेटकीपर अशी दुहेरी जबाबदारी असणाऱ्या मोनांक पटेल याने 95 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 7 फोरसह 127.37 च्या स्ट्राईक रेटने 121 धावांची नाबाद खेळी केली. मोनांक तिसऱ्या स्थानी बॅटिंगसाठी आला आणि नाबाद परतला. मोनांकने केलेल्या शतकी खेळीमुळे यूएसएला 50 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 304 धावा करता आल्या. यूएसएकडून स्टीव्हन टेलर याने 27 आणि स्मित पटेल याने 63 धावांचं योगदान दिलं. तर टी 20 वर्ल्ड कप 2024 च्या सलामीच्या सामन्यात कॅनडा विरुद्ध मॅचविनिंग खेळी करणाऱ्या आरोन जोन्स याने 15 धावांची भर घातली. तर शायन जहांगीर याने 47 बॉलमध्ये 57 रन्स केल्या. त्यामुळे आता कॅनडा विजयासाठी 305 धावांचं आव्हान मिळालं आहे.
दरम्यान प्रत्येक संघ या स्पर्धेत साखळी फेरीत 4 सामने खेळणार आहे. यूएसएचा हा पहिलाच सामना आहे. त्यानंतर यूएसए 15 ऑगस्टला नेदरलँड्स विरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर यूएसए तिसरा सामना हा 19 ऑगस्ट रोजी कॅनडा विरुद्ध भिडेल. तर चौथा आणि शेवटचा सामना हा 21 ऑगस्ट रोजी नेदरलँड्स विरुद्ध होणार आहे.
कॅनडा प्लेइंग ईलेव्हन : निकोलस किर्टन (कॅप्टन), आरोन जॉन्सन, दिलप्रीत बाजवा, आदित्य वरदराजन, परगट सिंग, हर्ष ठाकेर, श्रेयस मोव्वा (विकेटकीपर), साद बिन जफर, डिलन हेलिगर, कलीम सना आणि जेरेमी गॉर्डन.
युनायटेड स्टेट्स प्लेइंग ईलेव्हन : मोनांक पटेल (कॅप्टन आणि विकेटकीपर), स्टीव्हन टेलर, स्मित पटेल, आरोन जोन्स, मिलिंद कुमार, शायन जहांगीर, हरमीत सिंग, शॅडली व्हॅन शाल्कविक, जसदीप सिंग, अभिषेक पराडकर आणि नॉथुश केंजिगे.