
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे आहे. या दोन देशात स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. ही स्पर्धा 7 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. असं असताना बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने भारतात खेळण्यास नकार दिला आहे. त्यांच्या भूमिकेनंतर आयसीसीने त्यांच्याशी संपर्क साधला आणि मनधरणी करण्यास सुरुवात केली. पण बांग्लादेश क्रिकेट बोर्ड त्यांच्या म्हणण्यावर ठाम आहे. आता या स्पर्धेसाठी थोडे दिवस शिल्लक असल्याने आयसीसी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. आयसीसीची एक टीम बांगलादेशात जाणार आहे. तसेच या संदर्भात समोरासमोर आपलं म्हणणं मांडणार आहे. बांग्लादेशच्या स्पोर्ट्स सल्लागार आसिफ नजरूल यांनी आयसीसीच्या प्रस्ताविक दौऱ्याची माहिती दिली.
भारत आणि बांग्लादेश यांच्यातील वाद टोकाला गेला आहे. त्यामुळे आयसीसीने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बीसीबीसोबत चर्चा केली होती. आसिफ नजरूल यांनी स्पष्ट केलं की, बांग्लादेश टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळू इच्छिते. पण आयोजन स्थळाच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड करणार नाही. आसिफ नजरूल यांनी सांगितलं की, ‘ताज्या माहितीनुसार, बीसीबी अध्यक्षांनी मला सांगितलं की, आयसीसीची एक टीम बांगलादेशमध्ये चर्चेसाठी येण्याची शक्यता आहे. पण आमच्या भूमिकेत कोणताही बदल होणार नाही. आम्ही वर्ल्डकप स्पर्धेत श्रीलंकेत खेळण्यास उत्सुक आहोत. मला पूर्ण विश्वास आहे आयोजन करणं काही सहज शक्य आहे.’
बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने सुरक्षेचा मुद्दा समोर ठेवत संघ भारतात पाठवण्यास नकार दिला होता. इतकंच बांगलादेशचे सर्व सामने श्रीलंकेत आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. दुसरीकडे, आयसीसीने स्पर्धेचं आयोजन ठरलं आहे आणि आयतावेळी बदल करणं कठीण असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने या मागणीवर पुनर्विचार करावा. बीसीबीचे अध्यक्ष शखावत हुसैन यांनी सांगितलं की, ‘आमची भूमिका ठाम आहे. त्यात जराही बदल होणार नाही. आम्ही भारतात खेळणार नाही. आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे. ते पर्याय शोधत आहेत. चर्चेचे मार्ग खुले आहेत.’ दरम्यान, बांगलादेशने म्हणणं ऐकलंच नाही तर त्यांच्या जागी स्कॉटलँडला संधी मिळू शकते.