
आशिया कप 2025 स्पर्धेतील भारत पाकिस्तान सामन्याला वादाची किनार लाभली. सुपर 4 फेरीत पाकिस्तानच्या खेळाडूंनी केलेल्या कृत्याबाबत संताप व्यक्त होत आहे. त्यांच्या कृतीमुळे भारतीयांच्या भावना दुखावल्या होत्या. साहिबजादा फरहान याने गनशॉट सेलीब्रेशन केलं होतं. तर हारिस रऊफने विमान पाडल्याची कृती करत भारतीयांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता. इतकंच काय तर हारिस रऊफने भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांना शिवीगाळ केली आणि आक्षेपार्ह हावभावही केले होते.या कृतीप्रकरणी बीसीसीआयने आयसीसीकडे तक्रार केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयसीसीने हारिस रऊफ याला सामन्याच्या मानधनाच्या 30 टक्के दंड ठोठावला आहे. तर साहिबजादा फरहान याला गनशॉटसेलिब्रेशनसाठी फटकारण्यात आले आहे. पण त्याला दंड करण्यात आलेला नाही.
साहिबजादा फरहान याने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर बंदुकीसारखी बॅट पकडली आणि हवेत गोळीबार केल्याचं दाखवून दिलं. पहलगाम हल्ला आणि भारताच्या ऑपरेशन सिंदूरच्या दृष्टीने हे सेलिब्रेशन संवेदनशील मानला जात गेलं. त्यामुळे आयसीसीने त्याला असे सेलिब्रेशन पुन्हा न करण्याचा इशारा दिला आहे. साहिबजादा फरहानने 45 चेंडूत 58 धावा केल्या.
दुसरीकडे, हारिस रऊफची कृती ही खेळ भावनचेच्या विपरीत होती. त्यामुळे त्याला दंड ठोठावण्यात आला आहे. टीम इंडियाच्या फलंदाजीवेळी त्याने 6-0 असे हावभाव केले होते. त्यातून भारताची लढाऊ विमानं पाडल्याचं त्याला दाखवायचं होतं. भारतासाठी हा विषय संवेदनशील आणि चिथावणीखोर वाटला. आयसीसीने या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर त्यात रऊफचं वर्तन चुकीचं वाटलं. त्यामुळे त्याला शिक्षा ठोठावण्यात आली आहे. पण त्याच्यावर सामन्याची बंदी घालण्यात आली नाही. त्यामुळे अंतिम सामन्यात सहभागी होईल.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा हायव्होल्टेज सामना होणार आहे. आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हे दोन्ही संघ भिडणार आहेत. त्यामुळे या सामन्याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागून आहे. या सामन्यातही भारत नो हँडशेक पॉलिसी कायम ठेवणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 28 सप्टेंबरला होणार आहे.