
T20 World Cup 2026 Points Table Updated: टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत बरेच उलटफेर पाहायला मिळाले आहेत. तसं पाहिलं तर दुबळ्या संघाने पराभूत करण्याची घटना काही या स्पर्धेत घडलेली नाही. पण सध्याची स्थिती पाहता धाकधूक वाढली आहे. दुबळ्या संघांची कामगिरी मात्र चांगली राहिली आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेचा सहाव्या दिवशी गुणतालिकेत मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. क गटात काहीही होऊ शकतं अशी स्थिती आहे. नेपाळने इंग्लंडला पहिल्या सामन्यात विजयासाठी चांगलंच झुंजवलं. त्यामुळे इंग्लंडला 2 गुण मिळाले पण नेट रनरेट काही चांगला करता आला नाही. तर दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने इंग्लंडला पराभवाची धूळ चारली. त्यामुळे क गटात तिसऱ्या स्थानी घसरण झाली होती. आता इटली नेपाळ सामन्यामुळे चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे.
इटलीने नेपाळला 10 विकेट आणि 44 चेंडू राखून विजय मिळवला आहे. त्याचा फायदा इटलीला झाला आहे. इटलीच्या पदरात 2 गुण पडले आहेत. इतकंच काय तर नेट रनरेटही जबरदस्त सुधारला आहे. याचा फटका इंग्लंडच्या संघाला बसला आहे. इंग्लंडची थेट चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. त्यामुळे आता इंग्लंडला या स्पर्धेतील उर्वरित दोन सामने काहीही करून जिंकावेच लागतील. इंग्लंडचे उर्वरित सामने इटली आणि स्कॉटलँडविरूद्ध आहे. यापैकी एकही सामना गमावला तर इंग्लंडला स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागू शकतो. त्यामुळे इंग्लंडला उर्वरित दोन्ही सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवणं भाग आहे.
क गटात वेस्ट इंडिज, स्कॉटलँड, इटली, इंग्लंड आणि नेपाळ हे पाच संघ आहे. यापैकी या गटात टॉपला असलेल्या दोन संघांना सुपर 8 फेरीत जागा मिळणार आहे. त्यामुळे टॉप 2 मध्ये राहण्यासाठी चुरस वाढली आहे. वेस्ट इंडिजने आतापर्यंत 2 पैकी 2 सामने जिंकून 4 गुण आणि +1.625 नेट रनरेटसह पहिलं स्थान गाठलं आहे. स्कॉटलँडने 2 पैकी 1 सामन्यात विजय मिळवून 2 गुण आणि +0.950 नेट रनरेटसह दुसरं स्थान पटकावलं आहे.
इटलीचा संघ तिसऱ्या स्थानावर असून 2 पैकी एका सामन्यात विजय मिळवला आहे. 2 गुण आणि -0.352 नेट रनरेटसह तिसऱ्या स्थानी आहे. तर इंग्लंडचा संघ 2 पैकी 1 विजय मिळवत 2 गुण आणि -0.650 नेट रनरेटसह चौथ्या स्थानी आहे. तर नेपाळचा संघ दोन्ही सामन्यात पराभूत झाल्याने स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे.