ICC T20 Ranking : टॉप 10 मध्ये तीन भारतीय महिला क्रिकेटपटूंची एन्ट्री, कोण आहेत त्या जाणून घ्या
आशिया कप स्पर्धेत भारतीय महिला संघाची चमकदार कामगिरी सुरु आहे. भारतीय संघाचं उपांत्य फेरीतील स्थान निश्चित झालं आहे. असं असताना आयसीसीने वुमन्स टी20 क्रिकेटमधील क्रमवारी जाहीर केली आहे. नव्या यादीत भारतीय संघातील खेळाडूंना मोठ्या प्रमाणात बढती मिळाली आहे.

आयसीसीने वुमन्स टी20 क्रिकेटची क्रमवारी जाहीर केली आहे. यात भारतीय स्टार फलंदाज स्मृती मंधाना हीने आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे. तर फिरकीपटू दीप्ती शर्मा आणि रेणुका शर्मा यांनी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. पाकिस्तानविरुद्ध 45 धावांची जबरदस्त खेळी खेळणारी स्मृती मंधना पाचव्या स्थानावर आहे. चौथ्या स्थानावर असलेल्या लॉरा वोलवर्डपेक्षा फक्त पाच गुणांनी मागे आहे. आता आशिया चषक स्पर्धेतील उर्वरित सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केल्यास स्मृती मंधानाला क्रमवारीत वर जाण्याची संधी आहे. भारताची वेगवान गोलंदाज रेणुका सिंगने टॉप 10 मध्ये प्रवेश केला आहे. तिने दहाव्या स्थानावरून नवव्या स्थानावर झेप घेतली आहे. रेणुकाने आशिया कप स्पर्धेत आतापर्यंत 3 बळी घेतले आहेत. पाकिस्तानविरुद्ध 14 धावांत 2 बळी घेतले होते. तर दीप्ती शर्माने टी20 मधील क्रमवारीत तिसरे स्थान कायम राखले आहे.
ताज्या क्रमवारीत हरमनप्रीत कौर आणि शफाली वर्मा संयुक्तरित्या 11 व्या स्थानावर पोहोचल्या आहेत. कर्णधार हरमनप्रीत कौरने आशिया कपमध्ये आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली. हरमनला पाकिस्तानविरुद्ध काही मोठी खेळी करता आली नाही. फक्त पाच धावा केल्या. पण संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध 66 धावांची नाबाद खेळी करत गुणतालिकेत उसळी घेतली. दुसरीकडे, शफाली वर्माने चार स्थानांची झेप घेत 11वं स्थान गाठलं आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 40 आणि संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध 37 धावा केल्या होत्या. जेमिमाह रॉड्रिग्ज 19व्या क्रमांकावर आहे.
संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध 29 चेंडूत 64 धावांची नाबाद खेळी खेळणारी ऋचा घोष 28 व्या स्थानावरून 24 व्या स्थानावर पोहोचली आहे. टी20 फलंदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाची बेथ मुनी 769 गुणांसह अव्वल स्थानावर कायम आहे. टी20 गोलंदाजांच्या क्रमवारीत इंग्लंडच्या सोफी एक्लेस्टोन आणि सारा ग्लेन अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. दुसरीकडे, टी20 क्रमवारीत भारतीय संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर पहिल्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया आणि दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंड आहे.
