ICC Test Ranking मध्ये रोहितचा धमाका, विराट-यशस्वी कुठे?

Rohit Sharma Icc Test Ranking : आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत कॅप्टन रोहित शर्मा यासह यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहली या दोघांना फायदा झाला आहे.

ICC Test Ranking मध्ये रोहितचा धमाका, विराट-यशस्वी कुठे?
rohit sharma team india test
Image Credit source: Rohit Sharma X Account
| Updated on: Sep 11, 2024 | 5:51 PM

आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने इंग्लंड-श्रीलंका मालिका पार पडल्यानंतर कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. श्रीलंकेविरुद्ध शानदार कामगिरी करुनही जो रुट याला नुकसान झालं आहे. मात्र त्यानंतरही रुटने अव्वलस्थान कायम राखण्यात यश मिळवलंय. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाने इतक्यात कसोटी मालिका खेळलेली नाही. मात्र त्यानंतर टीम इंडियाच्या त्रिकुटाला फायदा झाला आहे. कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली आणि यशस्वी जयस्वाल या तिघांना फायदा झालाय. नक्की कोण कोणत्या स्थानी आहे? हे आपण जाणून घेऊयात.

जो रुट नंबर 1

इंग्लंडचा अनुभवी खेळाडू जो रुटने अव्वल स्थान कायम राखलं आहे. रुटच्या खात्यात 899 रेटिंग्स पॉइंट्स आहेत. रुटला श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात काही खास करता आलं नाही. त्याचाच रुटला काही प्रमाणात फटका बसला आहे. न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज केन विलियमसन दुसऱ्या तर डॅरेल मिचेल तिसऱ्या स्थानी आहे. केन आणि मिचेल या दोघांच्या नावावर अनुक्रमे 859 आणि 768 रेटिंग्स आहेत. तर ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्हन स्मिथच्या खात्यात ताज्या आकडेवारीनुसार 757 रेटिंग्स आहेत. स्टीव्हन चौथ्या स्थानी आहे. या चारही फलंदाजांनी आपलं स्थान कायम राखलंय.

रोहित-विराट ‘यशस्वी’

तसेच रोहित शर्मा याला एका स्थानाचा फायदा झाला आहे. हिटमॅन टॉप 5 मध्ये परतला आहे. रोहितकडे आता 751 रेटिंग्स आहेत. तर यशस्वी जयस्वाल 740 रेटिंग्ससह सहाव्या स्थानी आहे. यशस्वीने एका स्थानाची झेप घेत सहावं स्थान पटकावलं आहे. तर विराट कोहली आठव्या स्थानावरुन सातव्या क्रमांकावर पोहचला आहे. विराटकडे 737 रेटिंग्स पॉइंट्स आहेत.

टीम इंडियाच्या त्रिमुर्तीला फायदा

दरम्यान टीम इंडिया 19 सप्टेंबरपासून बांगलादेश विरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. कॅप्टन रोहित, विराट, यशस्वीसह इतर भारतीय फलंदाजांना शानदार कामगिरी करत आयसीसी रँकिंगमध्ये मोठी झेप घेण्याची संधी असणार आहे.