
वूमन्स टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेची विजयाने सुरुवात केली आहे. टीम इंडियाने गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये श्रीलंकेवर एकतर्फी विजय मिळवला. टीम इंडियाने श्रीलंकेला 270 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर श्रीलंकेने गुडघे टेकले. टीम इंडियाने श्रीलंकेला 45.4 ओव्हरमध्ये 211 धावांवर ऑलआऊट केलं. भारताने यासह डीएलएसनुसार 59 धावांनी हा सामना जिंकला. अमनज्योत कौर आणि दीप्ती शर्मा या दोघींनी बॅटिंग आणि बॉलिंगने योगदान देत भारताच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. तर इतरांनीही आपलं योगदान दिलं.
सामन्यातील पहिल्या डावात पावसाने 2 वेळा खोडा घातला. त्यामुळे सामन्यातील 3 ओव्हर कमी करण्यात आल्या. त्यामुळे भारताने 47 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 269 धावा केल्या. टीम इंडियाच्या प्रमुख फलंदाजांनी घोर निराशा केली. स्मृती मंधाना हीने 8 धावा केल्या. तर जेमिमाह रॉड्रिग्ज हीला भोपळाही फोडता आला नाही. कॅप्टन हरमनप्रीतला चांगली सुरुवात मिळाली. मात्र तिने निराशा केली. हरमनप्रीतने 21 धावांचं योगदान दिलं. प्रतिका रावल हीने 37 धावा जोडल्या. हर्लीन देओलचं अर्धशतक 2 धावांनी हुकलं. हर्लिनने 48 धावा केल्या. रिचा घोष 2 धावा करुन माघारी परतली. रिचा आऊट झाल्यानतंर टीम इंडियाचा स्कोअर 6 आऊट 124 असा झाला.
त्यानंतर अमनज्योत कौर आणि दीप्ती शर्मा या जोडीने कमाल केली. या दोघीनी सातव्या विकेटसाठी 103 धावांची भागादारी करत टीम इंडियाला चांगल्या स्थितीत आणलं. अमनज्योतने सर्वाधिक 57 धावा केल्या. त्यानंतर स्नेह राणा हीने दीप्तीला चांगली साथ दिली. स्नेह आणि दीप्ती दोघी नाबाद परतला. दीप्तीने 53 आणि स्नेह राणाने 28 धावा केल्या. भारताने अशाप्रकारे 269 धावांपर्यंत मजल मारली. श्रीलंकेसाठी इनोका रनवीरा हीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर उद्देशिका प्रबोधिने हीने 2 फलंदाजांना बाद केलं. तसेच अचिनि कुलासूर्या आणि चमारी अट्टापट्टू या दोघींनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
श्रीलंकेने विजयी धावांचा पाठलाग करताना संयमी सुरुवात केली. श्रीलंका पहिल्या 20 ओव्हरपर्यंत सामन्यात होती. मात्र त्यानंतर टीम इंडियाने जोरदार कमबॅक केलं आणि श्रीलंकेला पद्धतशीर गुंडाळलं. श्रीलंकेसाठी कॅप्टन चमारी अट्टापट्टू हीने सर्वाधिक 43 धावांचं योगदान दिलं. तर निलाक्षी डी सिल्वा हीने 35 धावा केल्या. या व्यतिरिक्त एकीलाही 30 पार पोहचता आलं नाही. दीप्ती शर्माने बॅटिंगने छाप सोडल्यानंतर बॉलिंगनेही छाप सोडली. दीप्तीने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. स्नेह राणा आणि श्री चरणी या दोघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर क्रांती गौड, अमनज्योत कौर आणि प्रतिका रावल या तिघींनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.