
भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात श्रीलंकेसमोर 270 धावांचं आव्हान ठेवलं आहे. पावसामुळे झालेल्या या 47 षटकांच्या सामन्यात टीम इंडियाने 8 विकेट्स गमावून 269 धावा केल्या. अमनज्योत कौर आणि दीप्ती शर्मा या जोडीने केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर टीम इंडियाला 250 पार मजल मारता आली. अमनज्योत आणि दीप्ती या दोघींनी अर्धशतकी खेळी केली. तसेच प्रतिका रावल, कॅप्टन हरमनप्रीत कौर आणि स्नेह राणा या तिघींनीही यात योगदान दिलं. आता भारतीय गोलंदाज श्रीलंकेविरुद्ध 269 धावांचा यशस्वी बचाव करत विजयी सलामी देणार का? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
टीम इंडियाची सलामी जोडी काही खास करु शकली नाही. श्रीलंकेने भारताला 14 धावांवर पहिलाच आणि मोठा झटका दिला. स्मृती मंधाना 8 रन्स करुन तंबूत परतली. त्यानंतर प्रतिका आणि हर्लीन देओल या जोडीने अर्धशतकी खेळी करत भारताला चांगल्या स्थितीत आणून ठेवलं. मात्र या जोडीला मोठी भागीदारी करता आली नाही. श्रीलंकेने भारताला 81 रन्सवर दुसरा झटका दिला. प्रतिकाने 37 धावा केल्या.
त्यानंतर इनोका रनवीरा हीने कमाल केली. इनोकाने भारताला डावातील 26 व्या ओव्हरमध्ये एकूण 3 झटके देत बॅकफुटवर ढकललं. इनोकाने हर्लिन, जेमिमाह रॉड्रिग्ज आणि कॅप्टन हरमनरप्रीत कौर या तिघींनी मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. हर्लिनने 64 बॉलमध्ये 48 रन्स केल्या. जेमिमाह गोल्डन डक ठरली. तर हरमनप्रीत 21 रन्सवर आऊट झाली. टीम इंडियाने 27 व्या ओव्हरमध्ये रिचा घोष हीच्या रुपात सहावी विकेट गमावली. त्यामुळे टीम इंडियाचा स्कोअर 6 आऊट 124 असा झाला.
झटपट 4 विकेट्स गमावल्याने टीम इंडिया पूर्णपणे बॅकफुटवर आली होती. मात्र अमनज्योत कौर आणि दीप्ती शर्मा या जोडीने निर्णायक भूमकिा बजावली.या दोघींनी भारताला अडचणीतून बाहेर काढलं. दोघींनी सातव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. या दरम्यान अमनज्योत आणि दीप्तीने फटकेबाजी केली. अमनज्योतने या दरम्यान 45 बॉलमध्ये अर्धशतक केलं. या दोघींनी 101 बॉलमध्ये 103 रन्सची पार्टनरशीप केली. त्यानंतर अमनज्योत आऊट झाली. अमनज्योतने 57 रन्स केल्या.
अमनज्योनंतर दीप्ती शर्मा आणि स्नेह राणा या जोडीने आठ्या विकेटसाठी 23 बॉलमध्ये 42 रन्स जोडल्या. स्नेह राणा हीने या 42 मध्ये 28 धावांचं योगदान दिलं. स्नेहने 15 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 2 फोरसह नॉट आऊट 28 रन्स करुन फिनिशिंग टच दिला. तर दीप्ती शर्मा हीने 53 रन्स केल्या. टीम इंडियाने अशाप्रकारे 269 धावा केल्या.