
टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत विजयी सुरुवात करण्यात अपयशी ठरली. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला कोलकातामधील ऐतिहासिक इडन गार्डन्समध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात 124 धावा करण्यापासून रोखलं. दक्षिण आफ्रिकेने भारताला 93 रन्सवर ऑलआऊट केलं आणि 30 धावांनी विजय मिळवला. तर दुसर्या बाजूला इंडिया ए विरुद्ध दक्षिण आफ्रिका ए यांच्यात 3 सामन्यांची अनऑफिशियल वनडे सीरिज खेळवण्यात येत आहे. भारताने दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला अवघ्या 132 धावांवर ऑलआऊट केलं. त्यामुळे आता टीम इंडियाला सलग दुसरा सामना जिंकून मालिका विजयाची संधी आहे.
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय केला. मात्र भारताच्या गोलंदाजांनी हा निर्णय 100 टक्के चुकीचा ठरवला. भारताच्या गोलंदाजांसमोर दक्षिण आफ्रिकेला 31 ओव्हरही खेळता आलं नाही. भारताने दक्षिण आफ्रिकेला 30.3 ओव्हरमध्ये गुंडाळलं.
दक्षिण आफ्रिकेच्या चौघांनाच फक्त 20 पेक्षा अधिक धावा करता आल्या. दक्षिण आफ्रिकेसाठी ओपनर रिवाल्डो मूनसामी याने सर्वाधिक 33 धावा केल्या. लुहान ड्री प्रिटोरियस, डियान फॉरेस्टर आणि डेलानो या तिघांनी अनुक्रमे 21, 22 आणि 23 अशा धावा केल्या. तिघांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तर दोघे आले तसेच झिरोवर आऊट होऊन परतले.
भारतासाठी एकूण 7 जणांनी बॉलिंग केली. अर्शदीप सिंह, प्रसिध कृष्णा,निशांत सिंधू, हर्षित राणा, तिलक वर्मा, आयुष बदोनी आणि विपराज निगम या 7 जणांनी बॉलिंग केली. मात्र भारताचे 3 गोलंदाजाच दक्षिण आफ्रिकेला पुरून उरले.
निशांत सिंधुने सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या. निशांतने 7 ओव्हरमध्ये 2.30 च्या इकॉनमीने अवघ्या 16 धावांच्या मोबदल्यात 4 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. हर्षित राणा याने 5 ओव्हरमध्ये 21 रन्स खर्चून 3 विकेट्स घेतल्या. प्रसिध कृष्णा याने दोघांना आऊट केलं. तर कॅप्टन तिलक वर्मा यानेही 1 विकेट घेतली. मात्र भारताचा प्रमुख गोलंदाज अर्शदीप सिंह विकेट घेण्यात अपयशी ठरला.
दरम्यान भारताने या मालिकेत ऋतुराज गायकवाड याने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर 13 नोव्हेंबरला विजय मिळवला. भारताने हे आव्हान 6 विकेट्स गमावून पूर्ण केलं होतं. ऋतुराजने या सामन्यात 117 धावा केल्या होत्या. त्यामुळे आता इंडिया ए टीमला सलग आणि एकूण दुसरा सामना जिंकून मालिका विजयाची सुवर्ण संधी आहे. त्यामुळे इंडिया ए टीम तिलक वर्मा याच्या नेतृत्वात हे आव्हान किती चेंडूत पूर्ण करते? याकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.