
दक्षिण आफ्रिकेने टेम्बा बावुमा याच्या नेतृत्वात कोलकातमधील इडन गार्डन्समध्ये पहिल्या कसोटी सामन्यातील तिसऱ्याच दिवशी भारतावर 30 धावांनी मात केली. टीम इंडिया 124 धावा करण्यात अपयशी ठरली. दक्षिण आफ्रिकेने या विजयासह 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. भारतीय संघ या धावा करण्यात अपयशी ठरली. मात्र अवघ्या तासांत इंडियाच्या ए टीमने दक्षिण आफ्रिकेच्या ए संघावर 50 षटकांच्या सामन्यात विजय मिळवला. भारताने यासह कसोटी सामन्यातील पराभवाची अवघ्या काही तासांतच परतफेड केली. तिलक वर्मा याच्या नेतृत्वात भारताच्या ए टीमने ही कामगिरी केली.
निशांत सिंधू याने 4 आणि हर्षित राणा याने 3 विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेला 30.3 ओव्हरमध्ये 132 रन्सवर ऑलआऊट केलं. त्यानंतर भारताने 133 धावांचं आव्हान हे 133 बॉलआधी पूर्ण केलं. टीम इंडियाने 27.5 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 135 रन्स केल्या. भारताचा हा या मालिकेतील सलग आणि एकूण दुसरा विजय ठरला. भारताने या विजयासह मालिका आपल्या नावावर केली. भारताने या मालिकेत 2-0 अशी निर्विवाद आघाडी घेतली आहे.
भारताचा युवा आणि सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड याने पहिल्या सामन्यात शतक झळकावत विजय मिळवून दिला. त्यानंतर ऋतुराजने या दुसऱ्या सामन्यातही तडाखेबंद खेळी करत भारताच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. तसेच अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा या जोडीनेही विजयात योगदान दिलं.
ऋतुराज आणि अभिषेक या सलामी जोडीने भारताला चांगली सुरुवात करुन दिली. या दोघांनी 8 ओव्हरमध्ये 53 धावांची भागीदारी केली. त्यानंतर अभिषेक शर्मा नवव्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर आऊट झाला. अभिषेकने 22 बॉलमध्ये 6 फोरसह 32 रन्स केल्या.
अभिषेकनंतर तिलक वर्मा मैदानात आला. ऋतुराज आणि तिलक या जोडीने उर्वरित धावा करत भारताला विजयी केलं. या दोघांनी 118 चेंडूत 82 धावांची नाबाद भागीदारी केली. तिलकने 62 बॉलमध्ये 29 रन्स केल्या. तर ऋतुराजने 9 चौकारांसह 83 चेंडूत 68 धावांचं योगदान दिलं आणि सामन्यासह मालिका जिंकून दिली.
दरम्यान भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना हा बुधवारी 19 नोव्हेंबरला होणार आहे. हा सामनाही राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियममध्ये होणार आहे. भारताला हा सामना जिंकून विजयी हॅटट्रिक करण्यासह दक्षिण आफ्रिकेचा 3-0 ने धुव्वा उडवण्याची संधी आहे.