IND vs SL: सुपर ओव्हरमध्ये पराभव झाल्यानंतर कर्णधार तिलक वर्माने थोडक्यात म्हणणं मांडलं, म्हणाला..
भारत अ आणि श्रीलंका अ यांच्यातील सामना अतितटीचा झाला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला सामना बरोबरीत सुटला. या सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेच्या बाजूने लागला. या पराभवानंतर भारताचं अंतिम फेरीचं गणित किचकट झालं आहे. असं असताना या सामन्याचं कर्णधार तिलक वर्माने थोडक्यात विश्लेषण केलं.

ट्राय नेशन सिरीजमध्ये भारत अ आणि श्रीलंका अ संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताने गमावला आणि प्रथम फलंदाजी करावी लागली. भारताने या सामन्यात निराशाजनक सुरूवात केली. आघाडीचे फलंदाजी फार काही करू शकले नाही. पण आठव्या विकेटसाठी विपरज निगम आणि सूर्यांश शेडगे यांनी 104 धावांची भागीदारी केली. त्यामुळे भारताने 49.2 षटकात सर्व गडी गमवून 265 धावा केल्या. पण विपरज खेळपट्टीच्या मधून धावल्याने पंचांनी 10 धावांची पेनल्टी ठोकली. त्यामुळे श्रीलंकेला फुकटच्या 10 धावा मिळाल्या. त्यामुळे हा सामना ड्रॉ करण्यात यश आलं. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकने 16 धावा केल्या आणि विजयासाठी 17 धावांचं आव्हान दिलं. पण भारताला 9 धावाच करता आल्या. या सामना भारताने सुपर ओव्हरमध्ये 7 धावांनी गमावला. असं असताना या सामन्यातील पराभवाचं विश्लेषण काही तिलक वर्माने केलं नाही. थोडक्यात चांगल्या बाजू सांगितल्या आणि म्हणणं संपवलं.
भारतीय संघाचा कर्णधार तिलक वर्मा म्हणाला की, ‘सामने खूपच अटीतटीचे झाले आहेत, हा सामनाही अगदी जवळ आला होता आणि दुर्दैवाने आम्ही सुपर ओव्हरमध्ये हरलो. सूर्यांश आणि विप्रराज यांची भागीदारी उत्कृष्ट होती आणि त्यांनी चांगली कामगिरी केली. एकंदरीत, गोलंदाजी चांगली होती. फिरकी गोलंदाज उत्कृष्ट होते आणि अर्शदने अखेरच्या षटकांमध्ये चांगली गोलंदाजी केली.’ आता भारतासाठी अफगाणिस्तानविरुद्धचा सामना करो या मरोची लढाई आहे. हा सामना भारताने गमावला तर अंतिम फेरीचं स्वप्न भंगेल. दुसरीकडे सामना जिंकला तरी श्रीलंका अफगाणिस्तान सामन्याकडे लक्ष ठेवावं लागणार आहे.
श्रीलंकेचा कर्णधार साहन अराचिगे याने सांगितलं की, ‘सामना जिंकणे खूप छान आहे. सदिरा खूप चांगली फलंदाजी केली आणि गोलंदाजांनीही त्यांचे काम चोख बजावले. वियास्कंथ आणि चमिका यांची फलंदाजी खूप चांगली झाली, जी आजच्या आमच्या विजयाची गुरुकिल्ली होती. आम्ही शेवटच्या सामन्याला एका सामान्य सामन्याप्रमाणेच खेळून जिंकण्याचे ध्येय ठेवू इच्छितो.’ श्रीलंकेने या विजयासह 4 गुण मिळवले आहेत. त्यामुळे अंतिम फेरीत जवळपास स्थान पक्कं केलं आहे. आता शेवटचा सामना अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे.