
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेनंतर आता आयपीएलच्या 19 व्या मोसमाकडे चाहत्यांचं लक्ष आहे. या स्पर्धेला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. तर ही स्पर्धा जवळपास मे महिन्यातील शेवटपर्यंत खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर टीम इंडिया एक्शन मोडमध्ये येणार आहे. टीम इंडियाला जून महिन्यापासून अनेक द्विपक्षीय मालिका खेळायच्या आहेत. त्यामुळे टीम इंडियात अनेक युवा खेळाडूंना पहिल्यांदाच संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अंडर 19 टीम इंडियातील फलंदाज वैभव सूर्यवंशी याने भारताला वर्ल्ड कप (U19 World Cup 2026) जिंकून देण्यात प्रमुख भूमिका बजावली होती. त्यामुळे वैभवला सिनिअर टीम इंडियात संधी मिळणार असल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं जात आहे.
टीम इंडिया टी 20i वर्ल्ड कप विजयानंतर आपली पहिली आंतरराष्ट्रीय मालिका मायदेशात अफगाणिस्तान विरुद्ध् खेळणार आहे. टीम इंडिया अफगाणिस्तान विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्यानंतर उभयसंघात फक्त 1 कसोटी सामना होणार आहे. उभयसंघातील हे एकूण 4 सामने 6 ते 20 जून दरम्यान खेळवण्यात येणार आहेत.
अफगाणिस्तान विरूद्धच्या मायदेशातील एकदिवसीय मालिका आणि कसोटी सामन्यानंतर टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यात 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळणार आहे. तर त्यानंतर उभयसंघात 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. उभयसंघात 1 ते 19 जुलै दरम्यान या दोन्ही मालिका खेळवण्यात येणार आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय संघ इंग्लंड दौऱ्याआधी आयर्लंड विरुद्ध टी 20i मालिका खेळू शकते. तसेच श्रीलंका क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयकडे टी 20i आणि कसोटी मालिका खेळवण्याबाबत विनंती केली आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट टीमचाही भारत दौरा नियोजित आहे. विंडीज 3 वनडे आणि 5 टी 20i सामने खेळणार आहे.
टीम इंडियाने गेल्या वेळेस ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वात आशियाई गेम्समध्ये सुवर्ण पदक मिळवलं होतं. यंदा ही स्पर्धा 25 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. त्यानंतर टीम इंडियाची झिंबाब्वे विरुद्ध टी 20i मालिका होणार असल्याचं म्हटलं जात आहे.
टीम इंडियाच्या मालिकांचा सपाटा हा ऑक्टोबरपर्यंत सुरुच असणार आहे. टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात ऑक्टोबरमध्ये एकदिवसीय, टी 20i आणि कसोटी मालिका नियोजित आहे. तसेच बांगलादेश विरूद्धच्या स्थगित मालिकेबाबतही निर्णय होऊ शकतो. त्यामुळे या अशा सातत्याने होणाऱ्या मालिकांमुळे टीम इंडियात युवा खेळाडूंना संधी मिळणार आहे. त्यामुळे वैभव सूर्यवंशी याला कोणत्या संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.