IND vs AFG : पहिला सामना पावसाचा? धर्मशालेत 13 जूनला पावसाची बॅटिंग! जाणून घ्या हवामान कसं असणार

IND vs AFG 1st ODI Weather Forecast : क्रिकेट चाहत्यांना टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान पहिल्या एकदिवसीय सामन्याचे वेध लागले आहेत. मात्र सामन्यावर पावसाचं सावट आहे. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला तर चाहत्यांची निराशा होणार हे निश्चित. जाणून घ्या.

IND vs AFG : पहिला सामना पावसाचा? धर्मशालेत 13 जूनला पावसाची बॅटिंग! जाणून घ्या हवामान कसं असणार
Shreyas Iyer IND vs AFG
Image Credit source: Getty
| Updated on: Jun 12, 2026 | 9:53 PM

अफगाणिस्तान क्रिकेट टीम भारत दौऱ्यात विजयी सुरुवात करण्यात अपयशी ठरली. टीम इंडियाने अफगाणिस्तानचा एकमेव कसोटी सामन्यात अडीच दिवसात धुव्वा उडवला. भारताने एकमेव कसोटी सामना हा डाव आणि 300 धावांनी जिंकला. त्यानंतर आता उभयसंघात 13 जूनपासून एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. उभयसंघात एकूण 3 एकदिवसीय सामने होणार आहेत. चाहत्यांना पहिल्या सामन्याची प्रतिक्षा आहे. मात्र त्याआधी चाहत्यांचा हिरमोड करणारी बातमी समोर आली आहे. पहिल्या सामन्यावर पावसाचं सावट आहे. त्यामुळे पहिलाच सामना पावसामुळे रद्द करावा लागणार का? अशी चर्चा पाहायला मिळत आहे. या निमित्ताने हवामान खात्याने काय म्हटलंय? जाणून घेऊयात.

पहिल्या सामन्यावर पावसाचं सावट

भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील पहिल्या सामन्याचं आयोजन हे धर्मशालेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. मात्र या सामन्यावर पावसाचं सावट आहे. पावसाने सामन्यात खोडा घातल्यास क्रिकेट चाहत्यांची निराशा होणार हे निश्चित आहे.

यलो अलर्टचा इशारा

धर्मशालेतील एचपीसीए क्रिकेट स्टेडियम निसर्गाच्या कुशीत वसलेलं आहे. हवामान विभागाकडून 13 जून रोजी धर्मशाला आणि आसपासच्या भागांना यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. हे स्टेडियम निसर्गाच्या कुशीत असल्याने इथे हवामान लवकर बदलतं. हवामान विभागाकडून धर्मशालेत 13 जून रोजी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पाऊस होण्याची 90 टक्के शक्यता

सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. एक्युवेदरच्या रिपोर्ट्सनुसार, दिवसा पाऊस होण्याची शक्यता ही 90 टक्के आहे. त्यामुळे पाऊस सामन्यात खोडा घालणार हे निश्चित समजलं जात आहे. अंदाज खरा ठरला तर टॉसही होणार नाही. त्यामुळे आता या सामन्यात काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दोन्ही संघांची पहिलीच मालिका

दरम्यान टीम इंडिया आणि अफगाणिस्तान यांच्यात द्विपक्षीय एकदिवसीय मालिका खेळवण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे. याआधी दोन्ही संघात एकदाही वनडे सीरिजचं आयोजन करण्यात आलेलं नाही. शुबमन गिल या मालिकेत भारताचं नेतृत्व करणार आहे. तर हशमतुल्लाह शाहीदी याच्याकडे अफगाणिस्तानच्या नेतृत्वाची धुरा आहे.

Follow Us