
मुंबई | टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान टी 20 मालिकेची सुरुवात 11 जानेवारीपासून होणार आहे. अफगाणिस्तान टीमची या सीरिजसाठी शनिवारी 6 जानेवारी रोजी घोषणा करण्यात आली. त्यानंतर 7 जानेवारीला भारतीय संघ जाहीर करण्यात आला. त्यानंतर टीम इंडियाच्या चाहते आनंदी झाले. कारण 14 महिन्यांनी टी 20 टीममध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांचं पुनरागमन झालं. हे दोघेही अखेरचा टी 20 सामना वर्ल्ड कप 2022 मध्ये इंग्लंड विरुद्ध खेळले होते.
क्रिकेट चाहत्यांना विराट आणि रोहितच्या कमबॅकची प्रतिक्षा होती. ती प्रतिक्षा अखेर रविवारी संपली. विराटची बॅट अफगाणिस्तान विरुद्ध चांगलीच चालते. विराटची अफगाणिस्तान विरुद्धची टी 20 मधील आकडेवारी ही उल्लेखनीय आहे. विराट अफगाणिस्तान विरुद्ध किती टी 20 सामने खेळलाय? तसेच त्याने किती धावा केल्या आहेत, हे जाणून घेऊयात.
विराट टी 20 क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी सज्ज आहे. तसेच आगामी टी 20 वर्ल्ड कपच्या हिशोबाने ही मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान या दोन्ही संघातील ही पहिलीच टी 20 मालिका आहे.या वरुन लक्षात येतं की उभयसंघात फारसे साने झालेले नाहीत. मात्र जितके सामने झाले, त्यात विराटने चाबूक बॅटिंग केलीय.
विराटने आतापर्यंत अफगाणिस्तान विरुद्ध एकूण 3 टी 20 सामने खेळले आहेत. विराटने या दरम्यान 172 च्या स्ट्राईक रेटने 172 धावा केल्या आहेत. विराटने या दरम्यान 1 शतक आणि 1 अर्धशतक ठोकलंय. विराटने अफगाणिस्तान विरुद्ध 2022 मध्ये आशिया कपमध्ये शतक झळकावलं होतं.
तेव्हा टी 20 फॉर्मेटनुसार आशिया कप खेळवण्यात आला होता. विशेष म्हणजे विराटचं अफगाणिस्तान विरुद्धचं शतक हे त्याच्या कारकीर्दीतील पहिलं शतक ठरलेलं. त्यामुळे आता विराटच्या चाहत्यांना त्याच्याकडून टी 20 सीरिजमध्ये अशाच कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
अफगाणिस्तान विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग , आवेश खान आणि मुकेश कुमार.
अफगाणिस्तान टीम | इब्राहिम झद्रान (कॅप्टन), रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इकराम अलीखिल (विकेटकीपर), हजरतुल्लाह झझाई, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, करीम जनत, अजमुल्लाह उमरजई, शराफुद्दीन अशरफ, मुजीब उर रहमान, फजल हक फारूकी, फरीद अहमद, नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदीन नायब आणि राशिद खान.