
मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेचं आयोजन यंदा भारतात करण्यात आलंय. वर्ल्ड कपला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. त्याआधीच ऑस्ट्रेलिया टीम इंडिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. ऑस्ट्रेलिया या दौऱ्यात टीम इंडिया विरुद्ध 3 सामन्यांची मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाने या मालिकेसाठी 17 सप्टेंबरला टीम जाहीर केली. त्यानंतर आता सोमवारी 18 सप्टेंबरला बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली. बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा या दोघांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकार परिषदेला हजेरी लावली.
अजित आगरकर यांनी या पत्रकार परिषदेतून टीम इंडियाची घोषणा केली. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या 2 सामन्यांसाठी कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन वेगळे आहेत. तर तिसऱ्या सामन्यासाठी नियमित कर्णधार आणि उपकर्णधार आहेत. नियमित कर्णधार रोहित शर्मा, उपकर्णधार हार्दिक पंड्या, कुलदीप यादव आणि विराट कोहली या चौघांना पहिल्या 2 मॅचसाठी विश्रांती दिलीय. त्यामुळे केएल राहुल नेतृत्व करणार आहे. तर रवींद्र जडेजा उपकर्णधारपद सांभाळेल.
पहिल्या 2 सामन्यांसाठी पुणेकर ऋतुराज गायकवाड याला संधी दिली गेलीय. ऋतुराज त्यानंतर एशियन गेम्स स्पर्धेसाठी रवाना होणार आहे. ऋतुराज एशियन गेम्समध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर तिसऱ्या सामन्यातून नियमित कर्णधार रोहित, उपकर्णधार हार्दिक, विराट आणि कुलदीप याचं कमबॅक होईल.
बीसीसीआय निवड समितीने आशिया कपसाठी निवडलेल्या खेळाडूंनाच वर्ल्ड कप टीममध्ये स्थान दिलं. आता ऑस्ट्रेलिया विरुद्धची वनडे सीरिज म्हणजे वर्ल्ड कपची रंगीत तालिम. त्यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धही त्याच खेळाडूंची निवड होणार हे जवळपास निश्चित होतं आणि तसंच झालं. मात्र या टीममध्ये दोघांची सरप्राईज एन्ट्री झाली. एक म्हणजे ऋतुराज गायकवाड आणि दुसरा म्हणजे आर अश्विन.
टीम इंडियाचा ऑलराउंडर अक्षर पटेल हा दुखापतीच्या जाळ्यात आहे. त्यामुळे अक्षरला आशिया कप फायनलमध्ये खेळता आलं नाही. अक्षरच्या दुखापतीमुळे अश्विनला वर्ल्ड कपमध्ये संधी मिळणार असल्याची चर्चा क्रीडा विश्वात सुरु होती. त्यात अश्विनची ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे टीममध्ये निवड करण्यात आलीय.
त्यात आणखी गमंत म्हणजे या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना हा 27 सप्टेंबरला पार पडणार आहे. तर वर्ल्ड कप टीममध्ये बदल करण्याची अंतिम तारीख ही 28 सप्टेंबर आहे. त्यामुळे एकंदरीत चित्र पाहता अश्विनचा वर्ल्ड कप टीम इंडियात एन्ट्री होऊ शकते.
केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा.
रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पंड्या, (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल*, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी आणि मोहम्मद सिराज.