
आयसीसी वनडे वुमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत टीम इंडियाच्या सलामी जोडीला पहिल्या 3 सामन्यात लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. स्मृती मंधाना आणि प्रतिका रावल या दोघींना सुरुवात मिळाली होती. मात्र त्यांना त्या खेळीचं मोठ्या आकड्यात रुपांतर करता आलं नाही. त्यामुळे या दोघींना टीकेचा सामना करावा लागला होता. तसेच भारतीय फलंदाजीबाबतही चिंता व्यक्त करण्यात येत होती. मात्र प्रतिका आणि स्मृती या जोडीने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यातून जोरदार कमबॅक करत टीकाकारांना चोख उत्तर दिलंय. या सलामी जोडीने वैयक्तिक अर्धशतकं झळकावण्यासह विक्रमी दीडशतकी भागीदारीही केली आहे. स्मृतीने या भागीदारी दरम्यान इतिहास घडवला आहे. भारताच्या या सलामी जोडीसमोर ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज रडकुंडीला आले आहेत.
स्मृतीने सामन्यातील 19 व्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर अर्धशतक पूर्ण केलं. स्मृतीने अर्धशतकासाठी 46 चेंडूंचा सामना केला. स्मृतीने या अर्धशतकी खेळीत 1 षटकार आणि 7 चौकार लगावले. स्मृतीचं हे एकदिवसीय कारकीर्दीतील 33 वं एकदिवसीय अर्धशतक ठरलं. स्मृतीने अर्धशतकानंतर गिअर बदलला. स्मृतीने मोठे फटके मारले. स्मृतीने यासह एका वर्षात 1 हजार धावा पूर्ण केल्या. तसेच स्मृती वनडे क्रिकेटमध्ये वेगवान 5 हजार धावा करणारी सर्वात युवा महिला फलंदाज ठरली.
स्मृतीनंतर प्रतिका रावल हीने फटकेबाजी करत अर्धशतकी टप्पा गाठला. प्रतिकाने 21 व्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर फिफ्टी पूर्ण केली. प्रतिकाने 73.91 च्या स्ट्राईक रेटने 69 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. प्रतिकाने या खेळीत 1 सिक्स आणि 7 फोर लगावले.
स्मृतीने याच 21 व्या ओव्हरमधील सहाव्या आणि शेवटच्या बॉलवर सिक्स ठोकला. स्मृतीने यासह एकदिवसीय क्रिकेटमध्ये 5 हजार धावा पूर्ण केल्या. स्मृती वनडे क्रिकेटमध्ये वेगवान आणि कमी वयात अशी कामगिरी पहिली महिला फलंदाज ठरली. तसेच स्मृतीने 5 हजार धावा करणारी एकूण पाचवी तर दुसरी भारतीय महिला फलंदाज होण्याचा बहुमान मिळवला.
स्मृती आणि प्रतिका या जोडीने अर्धशतकानंतर धावा करण्याचा वेग वाढवला. स्मृती तर कांगारुंच्या गोलंदाजांवर तुटून पडली होती. त्यामुळे स्मृती शतक करेल, असा विश्वास होता. मात्र तसं होऊ शकलं नाही. स्मृती आऊट होताच टीम इंडियाची 155 रन्सची ओपनिंग पार्टनरशीप ब्रेक झाली. टीम इंडियाची ऑस्ट्रेलिया विरुद्धची ही विक्रमी सलामी भागीदारी ठरली. स्मृतीने 66 बॉलमध्ये 121.21 च्या स्ट्राईक रेटने 80 रन्स केल्या. स्मृतीने या खेळीत 3 षटकार आणि 9 चौकार लगावले.