
भारत आणि बांग्लादेश यांच्यात दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानात होत आहे. पहिल्या कसोटी सामन्यात भारताने बांगलादेशचा 280 धावांनी धुव्वा उडवला. त्यामुळे मालिकेत भारताकडे 1-0 ने आघाडी आहे. असं असताना बांगलादेशचा संघ मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी प्रयत्नशील असेल. बांगलादेशचा मागच्या काही कसोटीतील खेळ पाहता त्यांचा प्रयत्न नक्कीच तोडीस तोड असेल यात शंका नाही. पाकिस्तानला त्यांच्याच भूमीवर 2-0 ने लोळवल्यानंतर असं बोलणं चुकीचं ठरणार नाही. दुसरीकडे, कानपूर ग्रीन पार्क हे मैदान तसं पाहिलं तर भारताला फार काही लाभलेलं नाही. या मैदानात एकूण 23 सामने झाले आहेत. त्यापैकी भारताने फक्त 7 सामन्यात विजय मिळवला आहे. 13 सामने अनिर्णित ठरले आहेत. तर तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिवच्या दृष्टीने सामना ड्रॉ झाला तर भारताला फटका बसू शकतो. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवून पुढची वाट सोपी करण्याकडे भारतीय संघाचा कल असेल.
या मैदानात भारताची कामगिरीबाबत सांगायचं तर, डिसेंबर 1986 मध्ये भारत श्रीलंका सामना झाला होता. या सामन्यात भारताने श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक 676 धावा केल्या होत्या. त्या विपरीत जानेवारी 1952 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळताना भारताची त्रेधातिरपीट उडाली होती. तेव्हा भारताने 61.5 षटकात फक्त 121 धावा केल्या होत्या. तसं पाहिलं तर भारताने 1983 नंतर येथे एकही सामना गमावलेला नाही. तेव्हा वेस्ट इंडिजने भारताला पराभवाची धूळ चारली होती. पण त्यानंतर भारताने सामना गमवला नसला तरी ड्रॉ होण्याचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळे सामना ड्रॉ होणंही भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने परवडणारं नाही. भारतीय संघ पहिल्यांदाच बांगलादेशविरुद्ध या मैदानात खेळणार आहे.
कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानात भारताने डिसेंबर 1996 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा 280 धावांनी पराभव केला. या मैदानावरील सर्वात मोठा विजय आहे. भारताने नोव्हेंबर 2009 मध्ये श्रीलंकेचा एक डाव आणि 144 धावांनी पराभव केला होता. ऑक्टोबर 1999 मध्ये न्यूझीलंडवर आणि एप्रिल 2008 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रत्येकी 8 विकेट्सने मात मिळवली होती.