IND vs BAN : काळा धागा चावत फलंदाजी करत होता शाकीब अल हसन, असं का ते जाणून घ्या

भारत आणि बांगालदेश यांच्यात कसोटी सामना सुरु असून दोन दिवसांचा खेळ संपला आहे. दुसऱ्या दिवशी भारताचा वरचष्मा दिसला. भारताने 227 धावांची आघाडी घेतली आहे. तसेच दुसऱ्या डावात 81 धावा केल्या असून भारताच्या 308 धावा झाल्या आहेत. दरम्यान, या सामन्यात एक विचित्र प्रकार पाहायला मिळाला. शाकीब अल हसन तोंडात काळा धागा चावत फलंदाजी करत होता.

IND vs BAN : काळा धागा चावत फलंदाजी करत होता शाकीब अल हसन, असं का ते जाणून घ्या
Image Credit source: Twitter
| Updated on: Sep 20, 2024 | 8:50 PM

भारत आणि बांग्लादेश सामन्यात एक विचित्र प्रकार सर्वांचा समोर आला. बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकीब अल हसन तोंडात काळा धागा चावत फलंदाजी करत होता. त्यामुळे हा प्रकार पाहून सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. शाकीब अल हसन कायम या ना त्या कारणाने चर्चेत असतो. त्याचा आक्रमक स्वभाव तर सर्वांनाच माहिती आहे. असं असताना हा नवा प्रकार काय आहे? याची चर्चा रंगली आहे. शाकीब अल हसनने बांगलादेशचा संघ अडचणीत असताना 32 धावांची खेळी केली. 64 चेंडूत 5 चौकारच्या मदतीने त्याने या धावा केल्या. पण रविंद्र जडेजाच्या फिरकीपुढे त्याची ही खेळी संपुष्टात आली. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर सब्सिट्यूट ध्रुव जुरेलनेत्याचा झेल पकडला आणि तंबूचा रस्ता दाखवला. पण त्याच्या खेळीपेक्षा काळ्या धागा चावण्याची चर्चा सर्वात जास्त रंगली आहे. शाकिब अल हसन तोंडात काळा धागा चावत फलंदाजी करण्याचं कारण काय? असा प्रस्न सर्वांनाच पड़ला आहे.अशी फलंदाजी करताना अद्यापतरी कोणाला पाहिलेलं नाही. त्यामुळे समालोचक दिनेश कार्तिकही हैरान झाला. पण या मागचं कारण तमीम इकबालने स्पष्ट केलं.

तमीमने सांगितलं की, शाकिबला या धाग्यामुळे फलंदाजी करण्यास मदत मिळते. या धाग्यामुळे त्याचा चेहरा लेग साईडला झुकत नाही. जेव्हा असं होतं तेव्हा धागा खेचला जातो आणि शाकीबला कळतं. दुसरीकडे, या धाग्यामुळे एकाग्रता करण्यासही मदत होते. कार्तिकने पुढे सांगितलं की, ‘शाकीबला यामुळे चेंडूवर सरळ नजर ठेवण्यास मदत होते.’ मधल्या काळात शाकिबला डोळ्यांचा त्रास होता. त्याने या संदर्भात लंडनमधील नेत्रचिकित्सकाचा सल्लाही घेतला होता. ग्लोबल टी20 स्पर्धेतही शाकीब जर्सी चावताना दिसला होता.

शाकीब अल हसन पहिल्या डावात गोलंदाजी करताना फेल ठरला होता. त्याने 8 षटकं टाकली पण त्याला एकही विकेट घेता आली नाही. दुसऱ्या डावातही शाकिबने 6 षटकं टाकली पण त्याला विकेट हाती लागलेली नाही. दरम्यान, भारताने दुसऱ्या दिवसअखेर 3 गडी गमवून 81 धावा केल्या आहेत. भारताकडे आधीच 227 धावांची आघाडी होती. त्यामुळे 308 धावा झाल्या आहेत. तर शुबमन गिल नाबाद 33, तर ऋषभ पंत नाबाद 12 धावांवर खेळत आहे.