
लीड्स कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताला पहिल्याच सत्रात फटका बसला. कर्णधार शुबमन गिल अवघ्या 8 धावा करून तंबूत परतला. एका बाजूने खिंड लढवत असलेल्या केएल राहुलला साथ देण्यासाठी ऋषभ पंत मैदानात उतरला. तीन विकेट पडल्यानंतर स्वाभाविकच ऋषभ पंत डिफेंसिव खेळत होता. कायम आक्रमक खेळणाऱ्या ऋषभ पंतला डिफेंसिव खेळताना पाहून क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला. कारण त्याचा स्वभाव असं खेळण्याचा नाही हे सर्वांनाच माहिती आहे. असं खेळताना त्याला दुखापत झाली. इतकंच नाही तर यावेळी त्याचा मजेदार संवादही ऐकायला मिळाला. लीड्स कसोटीच्या दुसऱ्या दिवसी 33 व्या षटकात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ब्रायडन कार्सचा एक चेंडू पंतच्या मांडीला लागला. डिफेंसिव खेळताना त्याला ही दुखापत झाली.
मांडीला चेंडू जोरात लागल्यानंतर ऋषभ पंत गप्प बसणार का? मग काय त्याने आपल्या मजेदार अंदाजात संवाद साधला. ‘प्रामाणिकपणे खेळण्याच्या नादात चेंडू सुटत आहेत.’ त्याचा हा संवाद ऐकून नॉन स्ट्राईकर एंडला असलेला केएल राहुल हसला. इतकंच काय तर समालोकानाही हसू आवरलं नाही. पंतच्या या संवादामुळे त्याचा बेफिकीर आणि मजेदार स्वभाव अधोरेखित झाला आहे. त्यानंतर त्याने पुढच्याच चेंडूवर नैसर्गिक खेळी करत चौकार मारला.
ऋषभ पंतने पहिल्या डावात देखील डिफेंसिव खेळ खेळला होता. त्यांतर नैसर्गिक खेळी दाखवत शतक ठोकलं होतं. लीड्स कसोटीच्या पहिल्या डावात त्याने 134 धावांची खेळी केली होती. यात 12 चौकार आणि 6 षटकार मारले होते. पंतचे कसोटीतील सातवे आणि इंग्लंडविरुद्ध चौथे षतक आहे. ऋषभ पंतने दुसऱ्या डावातही 30च्या वर धावा केल्या आहेत. लंच ब्रेकनंतर त्याने आणखी काही काळ तग धरला अर्धशतक आणि त्यानंतर पुन्हा शतक झळकावू शकतो. केएल राहुल आणि ऋषभ पंतने लंच ब्रेकपर्यंत 60हून अधिक धावांची भागीदारी केली. केएल राहुल नाबाद 72 धावांवर खेळत आहे.