IND vs ENG | जो रुट-ओली रॉबिन्सनची निर्णायक खेळी, इंग्लंडच्या पहिल्या डावात 353 धावा

India vs England 4th Test Day 2 | इंग्लंड क्रिकेट टीमने बॅकफुटवर गेल्यानंतर जोरदार कमबॅक केलं. जो रुट याने इंग्लंडसाठी तारणहाराची भूमिका बजावली.

IND vs ENG | जो रुट-ओली रॉबिन्सनची निर्णायक खेळी, इंग्लंडच्या पहिल्या डावात 353 धावा
| Updated on: Feb 24, 2024 | 11:21 AM

रांची | इंग्लंडचा टीम इंडिया विरुद्धच्या चौथ्या कसोटीतील पहिला डाव दुसऱ्या दिवशी झटपट आटोपला आहे. रवींद्र जडेजाने दुसऱ्या दिवशी इंग्लंडला झटपट 3 झटके देत पॅकअप केलं. जो रुट याने केलेलं चिवट नाबाद शतक आणि ओली रॉबिन्सननच्या अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडने 104.5 ओव्हरमध्ये ऑलआऊट 353 धावांवर मजल मारली. इंग्लंडकडून या 353 धावांदरम्यान 2 शतकी भागीदारी झाली. यामध्ये जो रुट-ओली रॉबिन्सनच्या भागीदारीचाही समावेश आहे.

इंग्लंडला दुसऱ्या दिवशी 3 विकेट्सच्या मोबदल्यात 51 धावाच करता आल्या. इंग्लंडने पहिल्या दिवसापर्यंत 7 बाद 302 धावा केल्या होत्या. ओली रॉबिन्सन आणि जो रुट या जोडीने दुसऱ्या दिवसाच्या खेळाची सुरुवात केली. मात्र त्यानंतर रवींद्र जडेजाने ही जोडी फोडून काढली. जडेजाने रॉबिन्सन याला 58 धावांवर आऊट केलं. रुट आणि रॉबिन्सन या दोघांनी आठव्या विकेटसाठी 163 बॉलमध्ये 102 धावांची शतकी भागीदारी केली. त्यानंतर जडेजाने शोएब बशीर आणि जेम्स एंडरसन या दोघांना भोपळाही फोडून दिला नाही. इंग्लंडकडून जो रुट याने सर्वाधिक 122 धावांची नाबाद खेळी केली.

सहाव्या विकेटसाठी शतकी भागीदारी

त्याआधी पहिल्या दिवशी इंग्लंडने लंचपर्यंत 112 धावांवर 5 विकेट्स गमावल्या होत्या. कॅप्टन बेन स्टोक्स याच्या रुपात इंग्लंडने पाचवी विकेट गमावली. मात्र इथूनच इंग्लंडच्या डावाला कलाटणी मिळाली. इंग्लंडच्या जो रुट आणि बेन फोक्स या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 261 बॉलमध्ये 113 धावांची भागीदारी केली. तर विकेटकीपर बेन फोक्स याने 47 आणि ओपनर झॅक क्रॉलीने 42 धावांचं योगदान दिलं. या व्यतिरिक्त इतरांचा भारतीय गोलंदाजांसमोर निभाव लागला नाही.

इंग्लंडची पहिल्या डावात झुंज

टीम इंडियाकडून रवींद्र जडेजा याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. डेब्यूटंट आकाश दीप याने 3 विकेट्स घेत आपली छाप सोडली. मोहम्मद सिराज याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर आर अश्विन याच्या खात्यात 1 विकेट गेली.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.

इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कर्णधार) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टले, ओली रॉबिन्सन, जेम्स एंडरसन आणि शोएब बशीर.