
न्यूझीलंड क्रिकेट टीमने राजकोटमध्ये इतिहास बदलला आहे. न्यूझीलंड राजकोट येथील निरंजन शाह स्टेडियममध्ये आतापर्यंत झालेल्या एकूण 5 एकदिवसीय सामन्यांत धावांचा पाठलाग करताना विजय मिळवणारी पहिलीच टीम ठरली आहे. भारताने केएल राहुल याने केलेल्या शतकाच्या जोरावर न्यूझीलंडसमोर विजयासाठी 285 धावांचं आव्हान ठेवलं होतं. न्यूझीलंडने हे आव्हान डॅरेल मिचेल याच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर 47.3 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. न्यूझीलंडने यासह पहिल्या सामन्यातील पराभवाची परतफेड केली. न्यूझीलंडने अशाप्रकारे 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली. सोबतच न्यूझीलंडचा भारताविरूद्धचा एकदिवसीय क्रिकेटमधील सलग 8 पराभवानंतर पहिला विजय ठरला. तसेच न्यूझीलंडने 8 वर्षांची प्रतिक्षा संपवली. न्यूझीलंडने भारतात 2017 साली शेवटचा सामना जिंकला होता.
न्यूझीलंडने भारताला टॉस जिंकून बॅटिंगसाठी भाग पाडलं. भारतासाठी केएल राहुल याच्या शतकाव्यतिरिक्त कर्णधार शुबमन गिल याने सर्वाधिक योगदान दिलं. केएलने 112 धावा केल्या. तर शुबमनने 56 धावांची खेळी केली. तर इतरांनीही योगदान दिलं. भारताने अशाप्रकारे 7 विकेट्स गमावून 284 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी 285 धावांचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंडला 50 धावांच्या आत 2 झटके दिले.
हर्षित राणा याने डेव्हॉन कॉनव्हे याला 16 धावांवर बोल्ड केलं. तर प्रसिध कृष्णा याने हेन्री निकोल्स याला 10 धावांवर मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर विल यंग आणि डॅरेल मिचेल या जोडीने दीडशतकी भागीदारी करत सामन्यावर घट्ट पकड मिळवली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 152 बॉलमध्ये 162 रन्सची पार्टनरशीप केली. कुलदीप यादव याने विल यंग याला आऊट करत न्यूझीलंडला एकूण तिसरा झटका दिला. मात्र तोवर उशिर झाला होता. यंगने 98 बॉलमध्ये 87 रन्स केल्या.
त्यानंतर डॅरेल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स या जोडीने न्यूझीलंडला विजयापर्यंत पोहचवलं. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद 78 धावांची भागीदारी केली. फिलिप्सने 32 धावा केल्या. तर डॅरेलने 117 चेंडूत 2 षटकार आणि 11 चौकारांच्या मदतीने नाबाद 131 धावा केल्या.
न्यूझीलंडसाठी हा दुसरा सामना करो या मरो असा होता. न्यूझीलंडला मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी कोणत्याही स्थितीत हा सामना जिंकणं गरजेचं होतं. न्यूझीलंडने या आरपारच्या लढाईत मैदान मारलं आणि मालिका बरोबरीत आणून ठेवली. त्यामुळे आता तिसरा आणि अंतिम सामना निर्णायक ठरणार आहे. हा सामना 18 जानेवारीला होणार आहे.