
भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने न्यूझीलंड विरूद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात चिवट आणि झुंजार शतक झळकावलं आहे. विराटने इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये 338 धावांचा पाठलाग करताना आणि भारतीय संघ अडचणीत असताना हे निर्णायक शतक ठोकलंय. विराटच्या या शतकामुळे भारताच्या विजयाचा आशा कायम आहेत. उभयसंघातील 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे विराट भारतीय संघाला शतकी खेळीनंतर आता सामन्यासह मालिका जिंकून देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
विराटने 40 व्या ओव्हरमधील सहाव्या अर्थात शेवटच्या बॉलवर 1 धाव घेतली. यासह विराटने शतक पूर्ण केलं. विराटने शतकापर्यंत पोहचण्यासाठी 91 चेंडूंचा सामना केला. तसेच विराटने या शतकी खेळीत 2 सिक्स आणि 8 फोर लगावले. विराटचं हे एकदिवसीय क्रिकेटमधील 54 वं तर न्यूझीलंड विरुद्धचं सातवं शतक ठरलं. तसेच विराटच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील हे 85 वं शतक ठरलं.
विराटचं 2026 वर्षातील हे पहिलंवहिलं आंतरराष्ट्रीय शतक ठरलं. विराटला न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्याच एकदिवसीय सामन्यात रविवारी 11 जानेवारीला शतक करण्याची संधी होती. मात्र विराटची ही संधी अवघ्या 7 धावांनी हुकली होती. विराट त्या सामन्यात 93 धावांवर बाद झाला होता. मात्र विराटने इंदूरमध्ये पहिल्या सामन्यातील चूक सुधारत धावांची शंभरी गाठली. विराट यासह नववर्षात एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतक करणारा भारताचा दुसरा फलंदाज ठरला. भारतासाठी केएल राहुल याने 2026 मध्ये पहिलंवहिलं आंतरराष्ट्रीय आणि एकदिवसीय शतक ठोकलं. केएलने न्यूझीलंड विरूद्धच्या दुसऱ्या वनडेत ही कामगिरी केली होती.
रेकॉर्डवीर विराट कोहली
Records keep tumbling 👑@imVkohli | #TeamIndia | #INDvNZ pic.twitter.com/NPmNWWlDnG
— BCCI (@BCCI) January 18, 2026
दरम्यान विराट कोहली याने शतकासह इतिहास घडवला आहे. विराट यासह न्यूझीलंड विरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय शतकं करणारा पहिलावहिला फलंदाज ठरला आहे. इंदूरमधील तिसऱ्या सामन्याआधी न्यूझीलंड विरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय शतकांचा विक्रम हा संयुक्तरित्या वीरेंद्र सेहवाग, रिकी पॉन्टिंग आणि विराट यांच्या नावावर होता. या तिघांनीही न्यूझीलंड विरुद्ध प्रत्येकी 6-6 एकदिवसीय शतकं झळकावली होती. मात्र विराटने इंदूरमध्ये शतक पूर्ण करताच या दोघांना मागे टाकलं आणि वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला.