
टीम इंडियाने 25 जानेवारीला न्यूझीलंड विरूद्धच्या तिसऱ्या टी 20i सामन्यात धमाकेदार विजय मिळवला. भारताने 154 धावांचं आव्हान हे 10 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. टीम इंडियाचा हा या 5 सामन्यांच्या मालिकेतील सलग आणि एकूण तिसरा विजय ठरला. टीम इंडियाने अशाप्रकारे कॅप्टन सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात आणखी एक टी 20i मालिका जिंकण्याची कामगिरी केली. गुवाहाटीत झालेल्या भारताच्या या विजयात कर्णधार सूर्या, इशान किशन आणि अभिषेक शर्मा या त्रिकुटाने मैदान गाजवलं.
अभिषेक, इशान आणि सूर्या या तिकडीने केलेल्या चाबूक बॅटिंगमुळे भारताने सामन्यासह मालिका आपल्या नावावर केली. मात्र संजू सॅमसन याने चाहत्यांची निराशा केली. संजूला गुवाहाटीत भोपळाही फोडता आला नाही. संजू गुवाहाटीत गोल्डन डक ठरला. त्यामुळे संजूला चौथ्या टी 20i सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमधून डच्चू मिळणार असल्याचं निश्चित समजलं जात आहे. तसेच टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये आणखी एक असे एकूण 2 बदल होण्याची अधिक शक्यता आहे.
संजूने न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या तिन्ही सामन्यात निराशा केली. संजूने 3 सामन्यांत मोजून 16 धावा केल्या. संजूने नागपूरमध्ये 10 धावा केल्या. टीम इंडियाचा विकेटकीपर रायपूरमध्ये 6 धावांवर बाद झाला. तर गुवाहाटीत झालेल्या तिसऱ्या सामन्यात संजू झिरोवर आऊट झाला. त्यामुळे संजूला चौथ्या सामन्यासाठी नारळ मिळण्याची शक्यता अधिक आहे. संजूला वगळल्यास श्रेयस अय्यर याला संधी मिळू शकते. तसेच श्रेयसला संधी मिळाल्यासह इशान किशन याला विकेटकीपिंग करावी लागू शकते.
ऑलराउंडर अक्षर पटेल याला पहिल्या सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे अक्षरला दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्याला मुकावं लागलेलं. न्यूझीलंडच्या फलंदाजाने मारलेला फटका अडवताना अक्षरच्या हाताला फटका बसल्याने दुखापत झाली. अक्षरला स्वत:च्याच बॉलिंगवर बॉल अडवताना ही दुखापत झाली. या दुखापतीमुळे अक्षरच्या बोटातून रक्त वाहू लागलं. अक्षरला संधी मिळाल्यास शिवम दुबे याला वगळलं जाऊ शकतं. आता टीम मॅनेजमेंट अंतिम निर्णय काय घेते? हे टॉसनंतरच स्पष्ट होईल.
न्यूझीलंड विरूद्धच्या चौथ्या टी 20i सामन्यासाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, हार्दिक पंड्या, रिंकू सिंह, हर्षित राणा, रवी बिश्नोई, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह.