IND vs NZ : कर्णधार सूर्यकुमारचा न्यूझीलंडला फायनलआधी असा इशारा! म्हणाला..

India vs New Zealand Icc T20i World Cup 2026 Final : टीम इंडिया आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 ट्रॉफीपासून 1 पाऊल दूर आहे. सूर्यासेनेसमोर या सामन्यात किवींचं आव्हान आहे. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने त्याआधी काय म्हटलं? जाणून घ्या.

IND vs NZ : कर्णधार सूर्यकुमारचा न्यूझीलंडला फायनलआधी असा इशारा! म्हणाला..
India Captain Suryakumar Yadav T20i World Cup 2026 Trophy
Image Credit source: PTI
| Updated on: Mar 08, 2026 | 3:26 AM

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात रविवारी 8 मार्चला आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील महाअंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. टीम इंडिया सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात न्यूझीलंड विरुद्ध 2 हात करणार आहे. टीम इंडियाने या सामन्याआधी नेट्समध्ये जोरदार सराव केला. प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनात खेळाडूंनी घाम गाळला. आता या सरावाला अंतिम रुप देताना खेळाडू कशी कामगिरी करतात याकडे साऱ्या देशाचं आणि क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे. या सामन्याआधी भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने प्रतिक्रिया दिली आहे. सूर्याने नक्की काय म्हटलंय, हे जाणून घेऊयात.

सूर्यकुमार यादव याने काय म्हटलं?

“निश्चितपणे अंतिम सामन्यात दबाव आणि अस्वस्थता असेल. भारतात खेळण्यासह वर्ल्ड कप ट्रॉफीचा सामना खेळणं ही मोठी बाब आहे. मात्र आमचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ उत्सूक आहेत”, असं सूर्याने म्हटलं. टीम इंडियाने 5 मार्च रोजी उपांत्य फेरीत इंग्लंडवर मात करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. इंग्लंड विरुद्धच्या विजयानंतर सूर्याने ही प्रतिक्रिया दिली होती.

टीम इंडियाची इथवरची कामगिरी

टीम इंडियाने साखळी फेरीत अजिंक्य राहत विजयी चौकार लगावला. त्यानंतर भारताने सुपर 8 फेरीत 3 पैकी 2 सामने जिंकले. त्यानंतर उपांंत्य फेरीत इंग्लंडवर मात करत सलग दुसऱ्यादा फायनलचं तिकीट मिळवलं.  टीम इंडियाने साखळी फेरीत यूएसए, नामिबिया,  पाकिस्तान आणि नेदरलँड्सवर मात केली. त्यानंतर टीम इंडियाला सुपर 8 फेरीतील पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे टीम इंडियासाठी सेमी फायनलच्या दृष्टीने सुपर 8 मधील उर्वरित दोन्ही सामने करो या मरो असे होते. मात्र या दोन्ही सामन्यात भारताने दमदार विजय मिळवला.  भारताने सुपर 8 फेरीतील दुसऱ्या आणि करो या मरो अशा स्थितीच्या सामन्यात झिंबाब्वेवर मात करत आपलं आव्हान कायम राखलं. त्यानंतर वेस्ट इंडिज विरुद्धच्या व्हर्च्युअल क्वार्टर फायनलमध्ये विजय मिळवत सेमी फायनलचं तिकीट मिळवलं.

सेमी फायनलमध्ये 7 धावांनी विजय

त्यानंतर टीम इंडियाने उपांत्य फेरीतील सामन्यात संजू सॅमसन याच्या 89 धावांच्या जोरावर 250 पार मजल मारली. भारताने विजयासाठी दिलेल्या 254 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने जेकब बेथल याच्या शतकी खेळीच्या जोरावर चिवट झुंज दिली. मात्र इंग्लंड अपयशी ठरली. इंग्लंडला 247 धावांपर्यंतच पोहचता आलं. भारताने अशाप्रकारे 7 धावांनी विजय मिळवला. त्यानंतर आता टीम इंडिया अंतिम फेरीत न्यूझीलंड विरुद्ध कोणत्या रणनितीने खेळते? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us