
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. या 3 सामन्यांच्या मालिकेला मोजून काही तासांचा अवधी बाकी आहे. उभयसंघात 11 जानेवारीपासून एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. त्यासाठी दोन्ही संघांची घोषणा करण्यात आली आहे. शुबमन गिल भारताचं नेतृत्व करणार आहे. तर मायकल ब्रेसवेल न्यूझीलंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. दोन्ही संघांनी पहिल्या सामन्याआधी सरावाला सुरुवात केली आहे.
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटची एकदिवसीय मालिका खेळली होती. त्या मालिकेत अनुभवी फलंदाज विराट कोहली याने बॅटिंगने धमाका केला होता. विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला होता. त्यानंतर आता विराट न्यूझीलंड विरुद्ध कशी कामगिरी करतो याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. त्याआधी विराटने सरावाचे फोटो इन्स्टाग्रामवरुन चाहत्यांसह पोस्ट केले आहेत. विराटने केलेली ही पोस्ट चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.
विराटच्या पोस्टची एकच चर्चा
विराटने न्यूझीलंड विरूद्धच्या वनडे सीरिजआधी सोशल मीडियावर 3 फोटो पोस्ट केले आहेत, त्यामुळे चाहते आश्चर्यचकीत झाले आहेत. विराट 2 वर्षांपासून ठराविक आणि मोजक्याच पोस्ट करत आहेत. विराट सोशल मीडियावर जाहीरातसंदर्भात बहुतांश फोटो टाकतोय. त्यामुळे विराटने सरावाचे फोटो टाकल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तसेच विराटने अखेर सरावाचे फोटो टाकल्याने चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला सामना हा बडोद्यात होणार आहे. विराट या सामन्यासाठी गुरुवारी बडोदात दाखल झाला आहे. विराटची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी विमानतळावर तोबा गर्दी केली होती. विराटने त्यानंतर स्टेडियममध्ये पोहचताच सरावाला सुरुवात केली. विराट व्यतिरिक्त यशस्वी जैस्वाल, हर्षित राणा, यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल या खेळाडूंनीही सराव केला.
दरम्यान विराटने एकदिवसीय क्रिकेटमधील गेल्या 4 सामन्यात सातत्य ठेवलं आहे. विराटने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 25 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या तिसऱ्या वनडेत 74 रन्सची खेळी केली होती. त्यानंतर विराटने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या 2 एकदिवसीय सामन्यांमध्ये शतक झळकावलं. तर विराटने तिसऱ्या सामन्यात नाबाद 65 धावा केल्या होत्या. त्यामुळे आता विराट मायदेशात किवींविरुद्ध कशी कामगिरी करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.