
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा आणि निर्णायक एकदिवसीय सामना हा बुधवारी 14 जानेवारीला राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियममध्ये होणार आहे. टीम इंडिया या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे भारताला राजकोटमध्ये विजय मिळवून मालिका नावावर करण्याची मोठी संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडला मालिकेतील आव्हान कायम राखायचं असेल तर कोणत्याही स्थितीत राजकोटमध्ये सामना जिंकावा लागणार आहे. त्यामुळे मालिकेतील या दुसऱ्या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना चढाओढ पाहायला मिळण्याची अधिक शक्यता आहे. मात्र हा सामना कोण जिंकणार हे दुपारी 1 वाजताच जवळपास स्पष्ट होईल. हे असं शक्य आहे? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.
टीम इंडियाने राजकोटमध्ये आतापर्यंत 4 एकदिवसीय सामने खेळले आहेत. भारताला त्यापैकी 3 सामन्यांमध्ये पराभूत व्हावं लागलं. तर केवळ एकाच सामन्यात विजय मिळवता आला आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारताला 3 सामन्यात विजयी धावांचा पाठलाग करताना पराभूत व्हावं लागलंय. तर भारताने जिंकलेल्या एकमेव सामन्यात पहिल्या डावात बॅटिंग केली होती. यावरुन असं स्पष्ट होतं की या मैदानात पहिले बॅटिंग करणाऱ्या संघाला विजयाची संधी जास्त आहे.
आता बॅटिंग करायची की बॉलिंग? हे ठरवण्यासाठी टॉस जिंकणं अर्थात नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागणं गरजेचं आहे. त्यामुळे टॉस फॅक्टर महत्त्वाचा ठरणार आहे. या सामन्याला दुपारी दीड वाजता सुरुवात होणार आहे. तर 1 वाजता टॉस होणार आहे. या मैदानात भारताचा गेल्या 4 एकदिवसीय सामन्यांच्या निकालाचा इतिहास पाहता टॉस जिंकून बॅटिंग करणाऱ्या संघाचा विजय झाल्याचं स्पष्ट आहे. त्यामुळे 1 वाजता विजेता कोण होणार हे टॉससह स्पष्ट होईल, असं म्हटलं जात आहे.
टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या सामन्यात 301 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. विराटने पहिल्या सामन्यात 93 धावा केल्या. कर्णधार शुबमन गिल याने अर्धशतक झळकावलं. उपकर्णधार श्रेयस अय्यर याने 49, रोहित शर्मा याने 26 तर केएल राहुल आणि हर्षित राणा या दोघांनी प्रत्येकी 29 धावा केल्या. तसेच इतरांनीही योगदान दिलं होतं.
त्यामुळे भारताला राजकोटमध्ये टॉस जिंकून 300 पेक्षा अधिक धावा करण्याची संधी आहे. राजकोटमध्ये 300 धावांचा पाठलाग सोपं नाही. तसेच कोणत्याही ठिकाणी 300 पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करणं हे आव्हानात्मक असतं. त्यामुळे आता भारत-न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या सामन्यात कोण विजय मिळवणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.