
न्यूझीलंड विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर भारतीय संघाने टी 20i मालिकेत आतापर्यंत जबरदस्त कामगिरी केली आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेआधी 5 टी 20i सामन्यांचा थरार रंगत आहे. भारताने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात सलग 3 सामने जिंकून मालिका आपल्या नावावर केली. त्यानंतर आता उभयसंघातील चौथा सामना हा बुधवारी 28 जानेवारीला होणार आहे. त्याआधी न्यूझीलंडने टीममध्ये काही बदल केले आहेत. न्यूझीलंड क्रिकेटकडून सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
न्यूझीलंड संघातून टीम इंडिया विरूद्धच्या चौथ्या टी 20i सामन्याआधी वेगवान गोलंदाज क्रिस्टीयन क्लार्क आणि टीम रॉबिन्सन या दोघांना उर्वरित मालिकेतून रिलीज करण्यात आलं आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याबाबतची माहिती दिली. तर जिमी निशाम, टीम सायफर्ट आणि लॉकी फर्ग्यूसन हे कॅम्पचा भाग असणार आहेत. तर फिन एलन हा चौथ्या टी 20i सामन्याआधी टीमसह जोडला जाणार आहे. उभयसंघातील चौथा सामना हा तिरुवनंतरपूरममध्ये आयोजित करण्यात आला आहे.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी 20i सामना हा 21 जानेवारीला नागपूरमध्ये खेळवण्यात आला. क्रिस्टियन क्लार्क याने या सामन्यातून टी 20i पदार्पण केलं. क्रिस्टियनने त्या सामन्यात 4 ओव्हरमध्ये 10 च्या इकॉनमी रेटने 40 धावा दिल्या. क्रिस्टीयनला पदार्पणातील सामन्यात फक्त 1 विकेटच घेता आली. तर टीम रॉबिन्सन याने पहिल्या सामन्यात 15 चेंडूत 21 धावा केल्या. मात्र दुसऱ्या टी 20i सामन्यासाठी क्लार्क आणि रॉबिन्सन या दोघांच्या जागी मॅट हॅन्री आणि टीम सायफर्ट या दोघांना संधी देण्यात आली. या दोघांना तिसऱ्या सामन्यासाठी कायम ठेवण्यात आलं. त्यामुळे रॉबिन्सन आणि क्लार्क या दोघांना फक्त 1 सामनाच खेळण्याची संधी मिळाली.
न्यूझीलंडकडून 2 खेळाडू रिलीज
Kristian Clarke and Tim Robinson have been released from the BLACKCAPS T20 squad in India with Jimmy Neesham, Lockie Ferguson and Tim Seifert now in camp.
Finn Allen will be the final squad member to join the side on Thursday in Trivandrum.#INDvNZ pic.twitter.com/PARjD3EsHf
— BLACKCAPS (@BLACKCAPS) January 26, 2026
दरम्यान टीम इंडियाने या टी 20i मालिकेतील पहिल्या तिन्ही सामन्यात न्यूझीलंडवर एकतर्फी विजय मिळवला. भारताने न्यूझीलंडचा नागपूर, रायपूर आणि गुवाहाटीत धुव्वा उडवला. न्यूझीलंडने गुवाहाटीत झालेल्या तिसर्या सामन्यात टीम इंडियासमोर 154 धावांचं सन्मानजनक आव्हान ठेवलं होतं. मात्र भारताच्या टॉप ऑर्डरमधील फलंदाजांनी विस्फोटक बॅटिंग केली. भारताने हे आव्हान अवघ्या 10 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. भारताने यासह सलग तिसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर केली. भारताने यासह कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टी 20i मालिका जिंकण्याची मालिका कायम ठेवली.