
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टी 20I सामन्याला मोजून काही तास बाकी आहे. उभयसंघातील या टी 20I मालिकेत एकूण 5 सामने होणार आहेत. त्यातील सलामीचा सामना हा नागपूरमधील व्हीसीए स्टेडियममध्ये होणार आहे. भारताच्या नववर्षातील पहिल्याच टी 20I सामन्याचा मान हा व्हीसीए स्टेडियमला मिळाला आहे. वर्ल्ड कप स्पर्धेआधी होणाऱ्या शेवटच्या मालिकेतील पहिला सामना पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. चाहत्यांची या सामन्याच्या तिकीटांसाठी स्टेडियम परिसरात एकच गर्दी पाहायला मिळाली.
बीसीसीआयकडून क्रिकेट चाहत्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे तिकीट बुक करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार काही चाहत्यांनी आधीच ऑनलाईन तिकीटं मिळवली आहेत. आता ॲानलाईन बुकिंग केलेल्या चाहत्यांना नागपुरातील व्हीसीएम स्टेडियवर तिकीटांचं वितरण केलं जात आहे. चाहत्यांची तिकीट मिळवण्यासाठी एकच गर्दी पाहायला मिळत आहे. स्टेडियम परिसरात कडाक्याची थंडी असूनही सकाळपासून क्रिकेट रसिकांची तिकीटासाठी ही गर्दी पाहायला मिळत आहे.
संत्रानगरी अशी ओळख असलेलं नागपूर भारताच्या मध्यभागी आहे. त्यामुळे भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याच्या तिकीटासाठी राज्यासह राज्याबाहेरतील चाहतेही रांगेत पाहायला मिळाले. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विविध राज्यातील चाहते तिकीटासाठी रांगेत उभे पाहायला मिळाले. व्हीसीएकडून गेल्या 3 दिवसांपासून तिकीट वाटप सुरु आहे.
भारतीय खेळाडूंनी पहिल्या टी 20I सामन्याआधी जंगल सफारीचा आनंद घेतला. भारताचे काही मोजक्या खेळाडूंना वाघोबा पाहण्यासाठी पेंचच्या जंगलात सफरीचा आनंद घेतला. टीम इंडियाचा विकेटकीपर संजू सॅमसन याने जंगल सफारीचा व्हीडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन पोस्ट केला आहे. संजूने पोस्ट केलेल्या या व्हीडिओत कॅप्टन सूर्याकुमार यादव याच्यासह विकेटकीपर इशान किशन, फिनिशर रिंकु सिंग आणि फिरकीपटू रवी बिश्नोई असल्याचं दिसत आहे.
दरम्यान टीम मॅनेजमेंट आणि कॅप्टन सूर्यकुमार यादव यांनी तिलक वर्मा याच्या जागी श्रेयस अय्यरऐवजी इशान किशन याला संधी देण्याचं निश्चित केलं आहे. इशान किशन न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या टी 20i सामन्यात तिसऱ्या स्थानी खेळणार असल्याचं कॅप्टन सूर्यकुमार यादव याने जाहीर केलं आहे.