
आशिया कप 2025 स्पर्धेतील अंतिम सामन्यात ट्रॉफी जिंकण्यासाठी भारत विरुद्ध पाकिस्तान हे 2 शेजारी आणि कडवट प्रतिस्पर्धी आमनेसामने आहेत. दोन्ही संघांची आशिया कप स्पर्धेच्या 41 वर्षांत अंतिम फेरीत आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. हा ब्लॉकबस्टर सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. सामन्याची चाहत्यांना गेल्या अनेक तासांपासून प्रतिक्षा लागून आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी साडे सात वाजता टॉस उडवण्यात आला. टीम इंडियाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव याने फिल्डिंगचा निर्णय घेत पाकिस्तानला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.
टीम इंडियाला अंतिम सामन्यात मोठा झटका लागला आहे. टीम इंडियाचा मॅचविनर खेळाडू हार्दिक पंड्या याला दुखापतीमुळे अंतिम सामन्याला मुकावं लागलं आहे, याबाबतची माहिती कर्णधार सूर्यकुमार याने नाणेफेकीनंतर दिली. भारतीय संघात एकूण 3 बदल करण्यात आले आहेत. जसप्रीत बुमराह आणि शिवम दुबे या दोघांचं कमबॅक झालं आहे. त्यामुळे हर्षित राणा आणि अर्शदीप सिंह या दोघांना बाहेर व्हावं लागलं आहे. तर हार्दिकच्या जागी स्टार फिनिशर रिंकु सिंह याला संधी दिली आहे. तर पाकिस्तानने प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
दरम्यान भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांची या आशिया कप स्पर्धेच्या 17 व्या हंगामात आमनेसामने येण्याची ही तिसरी वेळ ठरली आहे. याआधी उभयसंघात 2 सामने झाले. भारताने हे दोन्ही सामने जिंकले. टीम इंडियाने 14 सप्टेंबरला साखळी फेरीत पाकिस्तानला पराभूत केलं. त्यानंतर सुपर 4 फेरीत पाकिस्तानला पराभूत करत भारताने सलग दुसरा विजय मिळवला. त्यामुळे आता टीम इंडियाला अंतिम सामन्यात विजयी हॅटट्रिक पूर्ण करुन आशिया कप ट्रॉफीफीवर नाव कोरण्याची संधी आहे. त्यामुळे आता भारतीय गोलंदाज पाकिस्तानला किती धावांवर रोखणार? याकडे लक्ष असणार आहे.
पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन : साहिबजादा फरहान, फखर जमान, सैम अयुब, सलमान आगा (कॅप्टन), हुसैन तलत, मोहम्मद हरिस (विकेटकीपर), मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ आणि अबरार अहमद.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती.