IND vs PAK : पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यातून मॅचविनर बॉलरला डच्चू, सूर्या-गंभीर जोडीचा निर्णय

India vs Pakistan T20i World Cup 2026 : भारत विरुद्ध पाकिस्तान या महामुकाबल्याला शेवटचे काही मिनिटं बाकी असताना कर्णधार सूर्यकुमार यादव आणि हेड कोच गौतम गंभीर या दोघांनी प्लेइंग ईलेव्हनबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

IND vs PAK : पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यातून मॅचविनर बॉलरला डच्चू, सूर्या-गंभीर जोडीचा निर्णय
Jasprit Bumrah and Arshdeep Singh Team India
Image Credit source: PTI
| Updated on: Feb 15, 2026 | 6:09 PM

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला आता मोजून काही मिनिटांचा अवधी बाकी आहे. या सामन्याआधी दोन्ही संघांनी नेट्समध्ये जोरदार सराव केला आहे. हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या महामुकाबल्याचे सर्व तिकीटांची विक्री झाली आहे. यावरुन सामन्याची किती क्रेझ आहे, हे स्पष्ट होतं. स्टेडियममध्ये हळुहळु क्रिकेट चाहते येणं सुरु झालं आहे. अशात आता टीम इंडियाच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे.

अर्शदीप सिंहच्या जागी कुलदीप यादव याला संधी!

पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्यकुमार यादव आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर या जोडीने मोठा निर्णय घेतला आहे. सूर्या-गंभीरने पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यातून वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह याला बाहेर केलं आहे. तर अर्शदीपच्या जागी चायनामॅन फिरकीपटू कुलदीप यादव याचा समावेश करण्यात आला आहे. भारत-पाकिस्तान सामन्याचं वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांनी अर्शदीपच्या जागी कुलदीपचा समावेश करण्यात आल्याची माहिती दिली आहे. मात्र याबाबत बीसीसीआय किंवा आयसीसीकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

कुलदीप यादव पाकिस्तान विरुद्ध यशस्वी ठरला आहे. तसेच कोलंबोतील खेळपट्टी ही फिरकीपटूंसाठी पोषक असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे टीम इंडियाने अतिरिक्त फिरकीपटूसह खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

कुलदीपची पाकिस्तान विरुद्धची कामगिरी कशी?

कुलदीप यादव आतापर्यंत पाकिस्तान विरुद्ध 9 सामने खेळला आहेत. कुलदीपने या 9 सामन्यांत टीम इंडियासाठी पाकिस्तानला 23 झटके दिले आहेत. कुलदीपने या दरम्यान एका सामन्यात 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. तर कुलदीपने एकदा एका डावात 4 विकेट्सही मिळवल्या आहेत. त्यामुळे कुलदीप या आकडेवारीला साजेशी कामगिरी करुन कॅप्टन सूर्या आणि कोच गंभीरचा निर्णय योग्य ठरवतो का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अभिषेक शर्माचं कमबॅक फिक्स

दरम्यान अभिषेक शर्मा याचंही भारतीय संघात कमबॅक निश्चित आहे. अभिषेकला यूएसए विरूद्धच्या सामन्यानंतर आजाराचा सामना करावा लागला होता. त्यामुळे अभिषेकच्या जागी नामिबिया विरूद्धच्या सामन्यात संजू सॅमसन याला संधी देण्यात आली होती. मात्र आता अभिषेक कमबॅक करणार असल्याची माहिती कर्णधार सूर्यकुमार यादव याने पाकिस्तान विरूद्धच्या सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत दिली होती.

पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, ईशान किशन, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रिंकु सिंह, शिवम दुबे, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती.