IND vs SA : टीम इंडिया 124 धावा करण्यात अपयशी, पंतला पराभव जिव्हारी, कॅप्टनने दोघांचं नाव घेतलं

India vs South Africa 1st Test Post Match : शुबमन गिल याला साम्यादरम्यान मानेला झालेल्या दुखापतीमुळे पुन्हा मैदानात येता आलं नाही. त्यामुळे शुबमनच्या अनुपस्थितीत उपकर्णधार ऋषभ पंत यानेच नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारली. मात्र पंत भारताला विजयी करण्यात अपयशी ठरला.

IND vs SA : टीम इंडिया 124 धावा करण्यात अपयशी, पंतला पराभव जिव्हारी, कॅप्टनने दोघांचं नाव घेतलं
Rishahb Pant IND vs SA 1st Test
Image Credit source: Bcci
Updated on: Nov 16, 2025 | 4:37 PM

यजमान टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पराभूत व्हावं लागलं. पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने भारताला पराभवाची धुळ चारली. दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर 124 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र टीम इंडियाला 100 पार पोहचताही आलं नाही. भारताचा अशाप्रकारे तिसर्‍याच दिवशी पराभव झाला. दक्षिण आफ्रिकेने भारताला 93 वर गुंडाळून 30 धावांनी विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने यासह गेल्या दीड वर्षांची प्रतिक्षा संपवली. दक्षिण आफ्रिकेने 15 वर्षांनंतर भारतात कसोटी सामना जिंकला. भारताचा हा पराभव शुबमन गिल याच्या अनुपस्थितीत नेतृत्व करत असलेल्या ऋषभ पंत याला जिव्हारी लागला. शुबमनला दुसऱ्या दिवशी बॅटिंग करताना मानेला त्रास झाला. त्यामुळे सध्या शुबमनवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पंत काय म्हणाला?

ऋषभ पंत याने भारताच्या पराभवानंतर प्रतिक्रिया दिली. पंतने भारताच्या पराभवाचा टर्निंग पॉइंट सांगितला. पंतने या पराभवासाठी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमा आणि कॉर्बिन बॉश या दोघांनी केलेली भागीदारी निर्णायक ठरल्याचं नमूद केलं. या दोघांनी केलेल्या भागीदारीमुळे दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या डावात 153 धावांपर्यंत पोहचता आलं. दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 7 विकेट्स गमावून 93 धावा केल्या होत्या. तर कॉर्बिन बॉश आणि टेम्बा बवुमा या जोडीने आठव्या विकेटसाठी 79 बॉलमध्ये 44 रन्स केल्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला 150 पार मजल मारता आली.

“विजयी आव्हान गाठायला हवं होतं, हे मी मान्य करतो. तिसर्‍या दिवशी सकाळी टेम्बा बावुमा आणि कॉर्बिन बॉश या दोघांत झालेली भागीदारी आम्हाला भारी पडली”, असं पंतने पोस्ट मॅच प्रेझेंटेशन दरम्यान म्हटलं.

एक संघ म्हणून या दबावातून बाहेर यायला हवं. सध्या त्याबाबत विचार केलेला नाही, कारण आताच सामना संपलाय. आम्ही पुढील सामन्यात निश्चितच कमबॅक करु”, असा विश्वास पंतने व्यक्त केला.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा कसोटी सामना कुठे?

दरम्यान भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा आणि अंतिम कसोटी सामना हा शनिवार 22 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. या सामन्याचं आयोजन हे गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. टीम इंडिया या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर पडली आहे. त्यामुळे भारतासाठी हा सामना करो या मरो असा असणार आहे.