
भारत दौऱ्यावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिकेत दणक्यात सुरुवात केली. दक्षिण आफ्रिकेने भारताला पहिल्या कसोटीतील तिसऱ्या दिवशी पराभूत केलं. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडिया विरुद्ध 124 धावांचा यशस्वी बचाव करत 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. आता दक्षिण आफ्रिका गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये आयोजित दुसऱ्या कसोटी सामन्यातही मजबूत स्थितीत आहे. दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 300पेक्षा अधिक धावांची आघाडी मिळवली आहे. त्यामुळे भारतावर कसोटी मालिकेत 2-0 ने पराभूत होण्याची टांगती तलवार आहे.
भारताचे गोलंदाज या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या शेपटीच्या फलंदाजांना गुंडाळण्यात अपयशी ठरले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने 489 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर भारतीय फलंदाजांनीही निराशा केली. भारताचा डाव हा अवघ्या 201 धावांवर आटोपला.दक्षिण आफ्रिकेला अशाप्रकारे 288 धावांची आघाडी मिळाली. भारताच्या या निराशाजनक कामगिरीनंतर माजी कर्णधार अनिल कुंबळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुंबळेने भारतीय फंलदांज ज्या अंदाजात खेळले त्यावरुन टीका केली.
“भारताने फार वाईट बॅटिंग केली. भारताच्या बॅटिंगमध्ये संयम नव्हता. गोलंदाजांनी चांगली बॉलिंग केली. मात्र फलंदाज आक्रमक बॉलिंगसाठी तयार नव्हते. भारतीय फलंदाजांचा वेगाने धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न होता असं वाटतं, जे कसोटी क्रिकेटसह सुसंगत नाही. इतक्या मोठ्या धावसंख्येपर्यंत सावकाश पोहचलं जातं. मात्र भारताने त्या पद्धतीने खेळ केला नाही”, असं माजी कर्णधाराने जिओहॉटस्टारवर बोलताना म्हटलं.
“भारतीय संघाला पाहुण्या संघाने नियंत्रणात ठेवणं असं फार कमी घडतं. गुवाहाटीत त्यांची (दक्षिण आफ्रिकेची) रणनिती आणि त्याची अंमलबजावणी करण्याची पद्धत भारतावर वरचढ ठरली”, असं स्टेनने म्हटलं.
दरम्यान मार्को यान्सेन याने 6 विकेट्स घेत भारताला 201 रन्सवर ऑलआऊट करण्यात प्रमुख भूमिका बजावली. दक्षिण आफ्रिकेने भारताला 201 धावांवर रोखलं. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने भारताला फॉलोऑन न देता बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेकडे 288 धावांची आघाडी होतीच. दक्षिण आफ्रिकेच्या सलामी जोडीने त्यात दिवसाचा खेळ संपेपर्यंत आणखी 26 धावा जोडल्या. दक्षिण आफ्रिकेकडे आता एकूण 314 धावांची आघाडी झाली आहे. त्यामुळे आता टीम इंडियाचे गोलंदाज चौथ्या दिवशी कमबॅक करते का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं बारीक लक्ष असणार आहे.