IND vs SA : गुवाहाटी कसोटी सामन्यात दुपारच्या जेवणाआधी असेल टी ब्रेक! असं करण्याचं कारण की…

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुवाहाटीत होणार आहे. या सामन्यासाठी सत्र आणि वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. सामना अर्धा तास आधी सुरु होईल. तसेच जेवणाआधी टी ब्रेक असेल.

IND vs SA : गुवाहाटी कसोटी सामन्यात दुपारच्या जेवणाआधी असेल टी ब्रेक! असं करण्याचं कारण की...
IND vs SA : गुवाहाटी कसोटी सामन्यात दुपारच्या जेवणाआधी असेल टी ब्रेक! असं करण्याचं कारण की...
Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Nov 12, 2025 | 9:41 PM

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका 14 नोव्हेंबरपासूनस सुरू होत आहे. या मालिकेतील पहिला सामना कोलकात्यात, तर दुसरा सामना गुवाहाटीत होणार आहे. गुवाहाटीत पहिल्यांदाच कसोटी सामन्याचं आयोजन केलं आहे. यापूर्वी वुमन्स वनडे वर्ल्डकप आणि आयपीएल 2025 स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. 22 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी वेळापत्रक आणि सत्रात बदल केला गेला आहे. त्यामुळे खेळाडूंना जेवणाआधीच टी ब्रेक घ्यावा लागणार आहे. ईशान्य भारतात सूर्योदय आणि सूर्यास्त लवकर होतो. त्यात आता दिवस कमी आणि रात्र जास्त असं समीकरण आहे. त्यामुळे बीसीसीआयने सामन्यांच्या वेळांमध्ये बदल केला आहे. पाचही दिवस सामना ठरलेल्या वेळेपेक्षा अर्धा तास आधी सुरु होईल. त्यामुळे सत्राची वेळही बदलणार आहे. विश्रांतीची वेळही वेगळी असेल आणि खेळाडूंना दुपारच्या जेवणापूर्वी चहा ब्रेक घ्यावा लागेल.

गुवाहाटीतील वेळापत्रकानुसार सामना सकाळी 9 वाजता सुरू होईल. त्यासाठी नाणेफेकीची वेळ ही अर्धा तास आधी म्हणजेच सकाळी 8.30 वाजताची असेल. पहिलं सत्र सकाळी 9 ते 11 असेल. त्यानंतर 20 मिनिटांचा टी ब्रेक असेल. त्यानंतर दुसऱ्या सत्राचा खेळ सकाळी 11.20 ते 1.20 पर्यंत असेल. दुपारचं जेवण 1.20 ते 2 पर्यंत असेल. त्यानंतर शेवटचं सत्र दुपारी 4 वाजेपर्यंत असेल. या दरम्यान, 90 षटकांचा खेळ पूर्ण केला जाईल.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 च्या दृष्टीने ही मालिका भारतासाठी खूपच महत्त्वाची आहे. भारताने पहिल्याच सामना जिंकला तर गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेईल. विजयी टक्केवारी 66.67 टक्के होईल. सामना ड्रॉ झाला तर 58.33 विजयी टक्केवारीसह तिसऱ्या स्थानावर राहावं लागेल. दक्षिण अफ्रिकेने हा सामना जिंकला तर थेट तिसऱ्या स्थानावर झेप घेईल. तर भारताची चौथ्या स्थानावर घसरण होईल.

भारताने दक्षिण अफ्रिकेविरुद्धचे दोन्ही कसोटी सामने जिंकले तर अंतिम फेरीच्या दिशेने भारताचा दावा मजबूत होत जाईल. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत तीन कसोटी सामने खेळले असून तिन्ही जिंकल्याने विजयी टक्केवारी 100 आहे. तर भारताने दक्षिण अफ्रिकेला 2-0 ने पराभूत केलं भारताची विजयी टक्केवारी 70.37 टक्के होईल.