
भारताला दक्षिण आफ्रिकेकडून 0-2 अशा फरकाने व्हाईटवॉश स्वीकारावा लागला. दक्षिण आफ्रिकेने भारताला दोन्ही सामन्यांमध्ये एकतर्फी फरकाने पराभूत केलं. दक्षिण आफ्रिकेने यासह भारतात 25 वर्षांनंतर कसोटी मालिका जिंकण्याची कामगिरी केली. भारताला या पराभवामुळे मोठा झटका लागला. भारताची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या रँकिगमध्ये घसरण झाली. टीम इंडिया या पराभवासह थेट पाचव्या स्थानी फेकली गेली. तर दक्षिण आफ्रिकेने दुसरं स्थान काबिज केलं. आता उभयसंघात 30 नोव्हेंबरपासून एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना हा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचं होमग्राउंड असलेल्या रांची शहरात होणार आहे. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघ वनडे रँकिंगमध्ये कितव्या स्थानी आहेत? हे जाणून घेऊयात. तसेच टीम इंडियाला कसोटीप्रमाणे वनडेतही दक्षिण आफ्रिकेकडून धोका आहे का? हे समजून घेऊयात.
आयसीसीने अखेरीस 22 नोव्हेंबर रोजी वनडे रँकिंग अपडेट केली होती. त्यानुसार टीम इंडिया आयसीसी वनडे रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी विराजमान आहे. टीम इंडियाच्या खात्यात 122 रेटिंग पॉइंट्स आहेत. दुसर्या स्थानी चॅम्पियन्स ट्रॉफी उपविजेता न्यूझीलंड आहे. वर्ल्ड कप विजेता ऑस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान चौथ्या आणि श्रीलंका पाचव्या स्थानी आहे.
दक्षिण आफ्रिका टॉप 5 मध्ये नाही. दक्षिण आफ्रिका सहाव्या स्थानी विराजमान आहे. दक्षिण आफ्रिकेचे रेटिंगही 100 पेक्षा कमी आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या खात्यात 98 रेटिंग आहेत. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तब्बल 5 स्थानांचा फरक आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजमधून भारताच्या सिंहासनाला कोणताही धोका नाही.
भारताने एकदिवसीय मालिका 0-3 ने गमावली तरी पहिलं स्थान कायम राहिलं. सलग 3 सामन्यांमधील पराभवांनतर भारताचे 117 रेटिंग पॉइंट्स होतील. तर दक्षिण आफ्रिकेने 3-0 ने मालिका जिंकल्यास त्यांच्या खात्यातील रेटिंग पॉइंट्स 103 होतील. तसेच दक्षिण आफ्रिका सहाव्या स्थानावरुन पाचव्या क्रमांकावर पोहचेल.
टेम्बा बवुमा कसोटी मालिकेनंतर वनडे सीरिजमध्येही दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करणार आहे. तर नियमित कर्णधार शुबमन गिल याला दुखापतीमुळे या मालिकेला मुकावं लागलं आहे. त्यामुळे शुबमनच्या जागी विकेटकीपर बॅट्समन केएल राहुल याला कर्णधार करण्यात आलं आहे.