
टीम इंडिया 17 डिसेंबरला लखनौमधील एकाना स्टेडियममध्ये मालिका विजय मिळवण्यासाठी सज्ज होती. टीम इंडियाने या सामन्यासाठी जोरदार सराव केला होता .टीम इंडियाने तिसरा सामना एकतर्फी फरकाने जिंकून मालिकेत 2-1 ने आघाडी मिळवली होती. त्यामुळे भारताला लखनौत मालिका आपल्या नावावर करण्याची सुवर्णसंधी होती. तर दक्षिण आफ्रिकेसाठी मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी कोणत्याही स्थितीत लखनौत विजय मिळवणं बंधनकारक होतं. मात्र लखनौत अनपेक्षित असं झालं, ज्यामुळे सामना रद्द करावा लागला. धुक्यामुळे हा सामना रद्द करण्याचा निर्णय बीसीसीआयने जाहीर केला. हा सामना रद्द झाल्याने भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोघांपैकी कोणत्या संघाला तोटा झाला? हे जाणून घेऊयात.
लखनौतील या चौथ्या टी 20i सामन्याला 7 वाजता सुरुवात होणं अपेक्षित होतं. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार होता. मात्र धुक्यामुळे नाणेफेकीला विलंब झाला. त्यामुळे 6 वाजून 50 मिनिटं ते रात्री 9 वाजून 25 मिनिटं या दरम्यान एकूण 6 वेळा पंचांनी पाहणी केली. मात्र धुक्यामुळे सामना खेळवण्यासाठी आदर्श स्थिती नव्हती. त्यामुळे अखेर नाईलाजाने हा सामना रद्द करण्यात आला. आता हा सामना रद्द होणं कुणासाठी जास्त नुकसानकारक ठरलं? हे समजून घेऊयात.
टीम इंडियाने या मालिकेत विजयी सलामी दिली. भारताने कटकमध्ये दक्षिण आफ्रिकेवर मात केली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने न्यू चंडीगडमधील दुसऱ्या टी 20i सामन्यात पलटवार करत मालिकेत 1-1 ने बरोबरी केली. त्यानंतर भारताने धर्मशालेतील तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर एकतर्फी विजय साकारला. त्यामुळे भारताला लखनौत विजय मिळवून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी होती. तर दक्षिण आफ्रिकेसाठी हा सामना करो या मरो असा होता. मात्र हा सामना रद्द झाल्याने काही प्रमाणात दक्षिण आफ्रिकेला दिलासा मिळाला आहे.
दक्षिण आफ्रिकेवर मालिका पराभवाची टांगती तलवार होती. मात्र आता लखनौतील सामना रद्द झाल्याने दक्षिण आफ्रिकेला मालिकेत बरोबरी करुन टीम इंडियाला सीरिज जिंकण्यापासून रोखण्याची संधी निर्माण झाली आहे. तर टीम इंडिया ही मालिका गमावणार नाही हे निश्चित झालं. मात्र भारताला ही मालिका जिंकायची असेल तर पाचव्या सामन्यात विजय मिळवावा लागेल. त्यामुळे एक सामना रद्द झाल्याने मालिकेच्या दृष्टीने समीकरण बदललं आहे.