IND vs SA : टीम इंडिया मालिका विजयासाठी सज्ज, दक्षिण आफ्रिका रोखणार का?

India vs South Africa 2nd Odi Preview : टीम इंडियाने रांचीत विजयी सलामी देत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली होती. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिकेसमोर मालिकेत कायम राहण्यासाठी दुसऱ्या सामन्यात विजय मिळवण्याचं आव्हान आहे.

IND vs SA : टीम इंडिया मालिका विजयासाठी सज्ज, दक्षिण आफ्रिका रोखणार का?
Virat Rohit Team India
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Dec 03, 2025 | 12:13 AM

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्याचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. टीम इंडियाने या 3 सामन्यांच्या मालिकेत विजयी सुरुवात केली आहे. टीम इंडियाने पहिला सामना हा 17 धावांनी जिंकला होता. भारताने या विजयासह मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली. त्यामुळे टीम इंडियाकडे दुसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची दुहेरी संधी आहे. तर दक्षिण आफ्रिकेला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी कोणत्याही स्थितीत दुसरा सामना जिंकावा लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी दुसरा सामना हा करो या मरो असा आहे. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघात चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे.

उभयसंघातील दुसरा सामना हा रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार आहे. केएल राहुल टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर दक्षिण आफ्रिकेच्या नेतृत्वाची धुरा कोण सांभाळणार? याबाबत अनिश्चितता आहे. पहिल्या सामन्यात नियमित कर्णधार टेम्बा बवुमा याला विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे एडन मार्रक्रम याने नेतृत्व केलं होतं. त्यामुळे आता दुसऱ्या सामन्यात टेम्बा टीमसाठी मैदानात उतरणार की एडनच नेतृत्व करणार? हे टॉसवेळेसच स्पष्ट होईल.

दक्षिण आफ्रिका परतफेड करणार की टीम इंडिया जिंकणार?

टीम इंडियाने पहिला सामना हा 17 धावांनी जिंकला होता. भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 350 धावांचं आव्हान ठेवलं होतं. दक्षिण आफ्रिकेने तीव्र प्रतिकार केला. मात्र दक्षिण आफ्रिकेचा डाव हा 332 धावांवर आटोपला होता. भारातने यासह विजय मिळवला. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिका रांचीतील पराभवाची परतफेड रायपूरमध्ये करणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

दुसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल होणार?

साधारणपणे विजयी संघाच्या प्लेइंग ईलेव्हनध्ये बदल केले जात नाहीत, असा अलिखित नियम आहे. मात्र प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करायचा की नाही? याबाबत टीम मॅनेजमेंट अंतिम निर्णय घेत असते. पहिल्या सामन्यात टॉप आणि मिडल ऑर्डरमध्ये ऋतुराज गायकवाड याचा अपवाद वगळता सर्वांनी दुहेरी आकडा गाठला होता. मात्र ऋतुराजला तसं करणं जमलं नाही. तसेच वॉशिंग्टन सुंदर याला बॅटिंग आणि बॉलिंगने काही खास करता आलं नव्हतं. त्यामुळे या दोघांना विश्रांती दिली जाऊ शकते. या दोघांच्या जागी नितीश कुमार रेड्डी आणि तिलक वर्मा यांचा समावेश केला जाऊ शकतो. मात्र आता टीम मॅनेजमेंट काय निर्णय घेते? यावरच सर्व अवलंबून असणार आहे.