IND vs SA : टीम इंडिया-साऊथ आफ्रिका टी 20I मालिका, कोण करणार विजयी सुरुवात?

India vs South Africa T20i Series : टीम इंडियाची युवा ब्रिगेड दक्षिण आफ्रिकेविरुद्ध या टी 20i मालिकेसाठी सज्ज आहे. भारतीय संघाने पहिल्या सामन्याआधी जोरदार सराव केला आहे. आता पहिल्या सामन्यात कोण विजयी सुरुवात करतं? याकडे साऱ्यांचं लक्ष आहे.

IND vs SA : टीम इंडिया-साऊथ आफ्रिका टी 20I मालिका, कोण करणार विजयी सुरुवात?
aiden markram and suryakumar yadav ind vs sa t20i series 2024
Image Credit source: Bcci x Account
| Updated on: Nov 08, 2024 | 12:22 AM

टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात ही शुक्रवार 8 नोव्हेंबरपासून होत आहेत. टीम इंडिया या दौऱ्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकूण 4 सामन्यांची टी 20i मालिका खेळणार आहे. सूर्यकुमार यादव या मालिकेत भारताचं नेतृत्व करणार आहे. तर यजमान संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी ही एडन मार्करम याच्याकडे आहे. पहिला सामना हा 8 नोव्हेंबरला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे. तर त्याआधी 8 वाजता टॉस होणार आहे. हा सामना टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर मोबाईलवर लाईव्ह मॅचचा थरार जिओ सिनेमा एपद्वारे अनुभवता येईल.

सूर्याच्या नेतृत्वातील दुसरी टी 20i मालिका

टीम इंडियाने या आधी गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. तेव्हाही सूर्यकुमार यादवच भारताचा कर्णधार होता. तेव्हा भारताला 3 सामन्यांची मालिका जिंकता आली नव्हती. ही 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत सुटली होती. तर एक सामना रद्द करण्यात आला होता. त्यामुळे यंदा कॅप्टन म्हणून सूर्यासाठी दक्षिण आफ्रिका दौऱ्याची ही दुसरी वेळ आहे. त्यामुळे सूर्यकुमावर भारताला दक्षिण आफ्रिकेत मालिका विजय मिळवून देण्याची जबाबदारी असणार आहे. सूर्या कॅप्टन्सीसह युवा खेळाडूंकडून त्याला हवं ते कसं काढून घेतो? या साऱ्याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

टीम इंडियाच सरस

दरम्यान आतापर्यंत उभयसंघात एकूण 27 टी 20i सामने खेळवण्यात आले आहेत. टीम इंडियाने या 27 पैकी 15 सामने जिंकले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेला 11 वेळा विजयी होता आलं आहे. तर 1 सामन्याचा निकाल लागला नाही. त्यामुळे आकडे पाहता टीम इंडियाच सरस आहे, हे स्पष्ट होतं. मात्र या मालिकेचं आयोजन हे त्यांच्या घरात करण्यात आलं आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला घरच्या स्थितीचा फायदा असणार आहे. अशात भारतीय संघासमोर आव्हान असणार आहे. त्यामुळे भारतीय संघ कशी कामगिरी करतं? हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

टी 20i  मालिकेआधी कर्णधारांचं फोटोशूट

दक्षिण आफ्रिके विरूद्धच्या टी 20i मालिकेसाठी टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार वैशाख, अवेश खान आणि यश दयाल.

T20I सीरिजसाठी दक्षिण आफ्रिका टीम : एडन मार्करम (कॅप्टन), ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, डोनोव्हन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, पॅट्रिक क्रुगर, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मिहलाली मपोंगवाना, न्काबा पीटर, रायन सिमलेटन, रायन रिकेल लुथो सिपमला (तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यासाठी) आणि ट्रिस्टन स्टब्स.