
मुंबई : आशिया कप 2023 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताचं स्थान निश्चित झालं आहे. 4 गुणांसह नेट रनरेट चांगला असल्याने अंतिम फेरीतील स्थानाला धक्का पोहोचेल अशी स्थिती नाही. श्रीलंका विरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करणारी असल्याने तसा निर्णय घेतला. सुरुवात चांगली झाली मात्र त्यानंतर गडी बाद होण्याची रांगच लागली. भारताचा डाव अवघ्या 213 धावांवर आटोपला आणि विजयासाठी 214 धावांचं आव्हान दिलं गेलं.श्रीलंकेला होम ग्राउंडवर हे आव्हान अगदी सोपं होतं पण तसं झालं नाही. श्रीलंकेचा संपूर्ण संघ 172 धावांवर तंबूत परतला. भारताने श्रीलंकेवर 41 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात कुलदीप यादव याने 43 धावा देत 4 गडी बाद केले. पण एक वेळ अशी आली की भारत हा सामना गमावेल अशी स्थिती होती.
श्रीलंकेने 25 धावांवर तीन गडी गमावले होते. पण चौथ्या गड्यासाठी समरविक्रमा आणि चरिथ असलांका यांच्यात चांगली भागीदारी झाली. ही भागीदारी भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरत होती. त्यामुळे संघाचं 17 वं षटक कर्णधार रोहित शर्मा याने कुलदीप यादव याच्याकडे सोपवलं. यावेळी विकेटकीपर केएल राहुल हा कुलदीप यादव याच्याकडे गेला आणि त्याला काहीतरी सांगितलं.
केएल राहुल याच्या त्या टिपचा कुलदीप यादव याला फायदा झाला. दुसऱ्याच चेंडूवर सदीरा समाराविक्रमा बाद झाला. सदीराने चेंडू लांब मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅट जवळून जात थेट केएल राहुलच्या ग्लोजमध्ये आला. मग काय संधीचं सोनं करत केएल राहुलने स्टम्पिंग केलं आणि तंबूचा रस्ता दाखवला. सामन्यानंतर संजय मांजरेकर यांनी केएल राहुल याला त्या स्ट्रॅटर्जीबाबत विचारलं तेव्हा राहुलने सांगितलं की, “मी कुलदीपच्या गोलंदाजीचं श्रेय घ्यायचं नाही. मी फक्त एक मेसेज पास केला होता. आमचं नशिब चांगलं होतं की तसंच घडलं.”
As 'KUL' as it gets! 🧊@imkuldeep18 continues his sensational form as he rips one through the batter, while @klrahul pulls off a sharp stumping. 💥
Tune-in to #AsiaCupOnStar, LIVE NOW on Star Sports Network#INDvSL #Cricket pic.twitter.com/NZccClhhRW
— Star Sports (@StarSportsIndia) September 12, 2023
केएल राहुल याच्या कृतीमुळे क्रीडाप्रेमींना महेंद्रसिंह धोनी याची आठवण आली. महेंद्रसिंह धोनी विकेटकीपिंग करताना गोलंदाजांना फलंदाजांच्या मुव्हमेंटबद्दल सांगायचा. त्यामुळे गोलंदाजांना फायदा व्हायचा. कुलदीप यादव यानेही धोनीच्या टिपमुळे फायदा झाल्याचं सांगितलं आहे. असाच कित्ता पुन्हा एकदा केएल राहुल याने स्टम्प पाठून गिरवला.