
अंडर 19 आशिया कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत विरुद्ध श्रीलंका सामना पार पडला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पावसामुळे खेळपट्टी ओली झाल्याने हा सामना 20 षटकांचा करण्यात आला होता. श्रीलंकेने 20 षटकात 8 गडी गमवून 138 धावा केल्या आणि विजयासाठी 139 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान भारताने 18 षटकात गडी गमवून पूर्ण केलं. या विजयासह भारताने अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता अंतिम फेरीत भारताचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी होणार आहे. पाकिस्तानने दुसऱ्या उपांत्य फेरीत बांगलादेशला 8 गडी राखून पराभूत केलं. त्यामुळे अंतिम फेरीत भारत पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना पाहता येणार आहे.
श्रीलंकेने विजयासाठी दिलेल्या 139 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात काही चांगली झाली नाही. दुसर्या षटकातच टीम इंडियाला कर्णधार आयुष म्हात्रेच्या रुपाने धक्का बसला. त्याने 8 चेंडूत 1 षटकार मारत आणि 7 धावा करून बाद झाला. त्यामुळे वैभव सूर्यवंशीकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती. मात्र उपांत्य फेरीत वैभवदेखील फेल गेला. त्याने 6 चेंडूत 2 चौकार मारत 9 धावा केल्या आणि तंबूत परतला. दोन विकेट झटपट गेल्यानंतर टीम इंडियावर दडपण वाढलं होतं. रसिथ निमसाराने भेदक गोलंदाजी केली. पण एरोन जॉर्ज आणि विहान मल्होत्रा यांनी डाव सावरला आणि टीम इंडियाला विजयाची चव चाखून दिली.
विहान मल्होत्राने 35 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. तर अरोन जॉर्जनेही 42 चेंडूत 50 धावा केल्या आणि संघाच्या विजयात मोलाची साथ दिली. विहान मल्होत्राने नाबाद 61 धावा, तर अरोन जॉर्जने नाबाद 58 धावांची खेळी केली. या दोघांच्या शतकी भागीदारीमुळे टीम इंडियाला विजय मिळाला. श्रीलंकेकडून कर्णधार विमथ दिनसारा याने 32, चमिका हीनाटीगालाने याने 42 आणि सेठमिका सेनेविरत्ने याने 30 धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त एकही फलंदाज मोठी धावसंख्या करून शकलं नाही. भारताकडून हेनिल पटेल आणि कनिष्क चौहान यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर किशन कुमार सिंग, दीपेश देवेंद्रन आणि खिलन पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट काढली.