IND vs WI : विंडीज विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केव्हा?

India vs West Indies Test Series 2025 : वेस्ट इंडिजने टीम इंडिया विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर करुन आपण सज्ज असल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे आता भारतीय संघाची घोषणा केव्हा केली जाणार? याकडे चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

IND vs WI : विंडीज विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केव्हा?
Team India Shubman Gill
Image Credit source: Bcci
| Updated on: Sep 22, 2025 | 11:35 PM

इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यात जून-जुलै महिन्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात आली. दोन्ही संघांची ही आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीप 2025-2027 साखळीतील पहिलीवहिली कसोटी मालिका होती. तसेच कर्णधार म्हणून शुबमन गिलची ही पहिलीच मालिका होती. शुबमन गिल याच्या नेतृत्वात भारताला ही मालिका जिंकता आली नाही. मात्र भारताने यजमान इंग्लंडलाही मालिका जिंकण्यापासून रोखलं. उभयसंघातील मालिका 2-2 ने बरोबरीत राहिली.

त्यानंतर आता टीम इंडिया या साखळीतील आपली एकूण दुसरी तर मायदेशातील पहिली मालिका लवकरच खेळताना दिसणार आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यात एकूण 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. विंडीज या दौऱ्यासाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. विंडीजने या मालिकेसाठी 16 सप्टेंबरला 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. रॉस्टन चेज विंडीजचं नेतृत्व करणार आहे.

टीम इंडियाची घोषणा केव्हा?

विंडीजनंतर बीसीसीआय निवड समिती या टेस्ट सीरिजसाठी टीम इंडियाची निवड केव्हा करणार, असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. त्याचं कारणही तसंच आहे. या मालिकेला आता मोजून काही दिवसच बाकी आहेत. त्यामुळे निवड समिती कुणाचा समावेश करणार आणि कुणाला डच्चू देणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागून आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 23-24 सप्टेंबर दरम्यान भारतीय संघ जाहीर केला जाऊ शकतो.

करुण नायरला संधी मिळणार?

विंडीज विरुद्ध मायदेशात होणार्‍या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात करुण नायर याला संधी मिळणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. करुणला अनेक वर्षांनंतर इंग्लंड दौऱ्यासाठी संधी दिली होती. मात्र करुणला त्या मालिकेत काही खास करता आलं नव्हतं. करुणने 4 सामन्यांमधील 8 डावांत 205 धावा केल्या होत्या. त्यामुळे आता निवड समिती करुणबाबत काय निर्णय घेते? हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

अहमदाबाद आणि दिल्लीत सामन्यांचं आयोजन

दरम्यान उभयसंघातील कसोटी मालिकेचं आयोजन हे 2 ते 14 ऑक्टोबर करण्यात आलं आहे. मालिकेतील सलामीचा सामना हा 2 ते 6 ऑक्टोबर दरम्यान अहमदाबादमध्ये होणार आहे. तर दुसरा आणि अंतिम सामना 10 ते 14 ऑक्टोबर दरम्यान दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे.

2 सामने आणि 1 मालिका

पहिला सामना, 2 ते 6 ऑक्टोबर, अहमदाबाद.

दुसरा सामना, 10 ते 14 ऑक्टोबर, नवी दिल्ली.