
टीम इंडिया वेस्ट इंडिज विरुद्ध मायदेशात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. टीम इंडिया दुसरा सामना जिंकून विंडीजला 2-0 ने व्हाईटवॉश करण्यासाठी सज्ज आहे. विंडीजने टीम इंडियाला 121 धावांचं आव्हान दिलं. भारताने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 1 विकेट गमावून 63 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाला पाचव्या आणि अंतिम दिवशी विजयसाठी आणखी 58 धावांची गरज आहे. या सामन्यादरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने सामन्यातील चौथ्या दिवशी मोठा विक्रम आपल्या नावावर केला. जसप्रीत बुमराहशिवाय इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या मोहम्मद सिराजने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. सिराजने नक्की काय केलं? जाणून घेऊयात.
मियाँ मॅजिक या नावाने ओळखला जाणाऱ्या सिराजने चौथ्या दिवशी वेस्ट इंडिजचा फलंदाज शाई होप याला क्लिन बोल्ड केलं. सिराज यासह 2025 या वर्षात सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारा पहिला फलंदाज ठरला. सिराजने याबाबतीत झिंबाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुझरबानी याचा विक्रम मोडीत काढला. सिराजने शाई होप याला आऊट करत 2025 वर्षातील 37 वी विकेट मिळवली. सिराजने यासह ब्लेसिंगला मागे टाकलं.
मोहम्मद सिराज : 37 विकेट्स
ब्लेसिंग मुझरबानी : 36 विकेट्स
मिचेल स्टार्क : 29 विकेट्स
नॅथन लायन : 24 विकेट्स
सिराज व्यतिरिक्त दिल्ली कसोटीत क्रिकेट चाहत्यांना चौथ्या दिवशी खास नजारा पाहायला मिळाला. विंडीजची यासह तब्बल 51 वर्षांची प्रतिक्षा संपली.
विंडीजसाठी दुसऱ्या डावात 2 फलंदाजांनी शतक झळकावलं. विंडीजसाठी जॉन कँपबेल आणि शाई होप या दोघांनी शतक ठोकलं. यासह विंडीजच्या जोडीची भारतात एकाच डावात तब्बल 51 वर्षांनतर 2 शतकं करण्याची पहिली वेळ ठरली. विंडीजसाठी कँपबेल याने 115 रन्स केल्या. शाई होपने 103 धावा केल्या.
मियाँ मॅजिक
TESTS IN 2025 IS MOHAMMED SIRAJ 😍🔥 pic.twitter.com/aDfNd3Lonk
— Johns. (@CricCrazyJohns) October 13, 2025
दरम्यान टीम इंडिया या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. भारताने पहिला कसोटी सामना हा डाव आणि 140 धावांनी जिंकला होता. विशेष म्हणजे भारताने अवघ्या अडीच दिवसात विंडीजवर मात केली होती. भारताचा हा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील मायदेशातील पहिलाच विजय ठरला. त्यानंतर आता टीम इंडिया मंगळवारी विंडीजला लोळवून 2-0 ने धुव्वा उडवण्यासाठी तयार आहे.