इंग्लंड दौऱ्यात करूण नायरची शतकी खेळी, 9 वर्षानंतर जोरदार कमबॅक

भारतीय अ संघ इंग्लंड दौऱ्यावर असून अभिमन्यू ईश्वरनच्या नेतृत्वाखाली इंग्लंड लायन्सविरुद्धच्या मैत्रिपूर्ण कसोटी सामना खेळत आहे. या सामन्यात भारत अ संघाकडून खेळताना करुण नायरने शतकी खेळी केली. त्याचं 24वं प्रथम श्रेणी शतक आहे.

इंग्लंड दौऱ्यात करूण नायरची शतकी खेळी, 9 वर्षानंतर जोरदार कमबॅक
करुण नायर शतक
Image Credit source: Getty Images
| Updated on: May 30, 2025 | 10:49 PM

त्रिशतकी खेळी करणारा करूण नायर भारतीय संघातून अचानक गायब झाला होता. पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर टीम इंडियात जागा मिळवली आहे. नऊ वर्षानंतर त्याचं कमबॅक झालं आहे. आता भारत अ संघ इंग्लंड दौऱ्यावर असून अभिमन्यू ईश्वरनच्या नेतृत्वात खेळत आहे. इंग्लंड लायन्सविरुद्ध मैत्रिपूर्ण कसोटी सामना खेळत आहे. या सामन्यात करुण नायरने भारत अ संघाची बाजू सावरली. यशस्वी जयस्वाल बाद झाला आणि अभिमन्यू ईश्वरनही काही खास करू शकला नाही. पण करूण नायर एका बाजूने खिंड लढवत राहिला. सरफराज खानसोबत चांगली खेळी करणाऱ्या करुणने शानदार शतक झळकावले. करुण नायरचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 24 वे शतक आहे.टीम इंडियाबाहेर असलेला अनुभवी फलंदाज करुण नायर गेल्या वर्षभरापासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने धावा काढत आहे. त्याच्या खेळीच्या जोरावरच त्याला संघात स्थान मिळालं आहे.

रणजी ट्रॉफीपासून ते विजय हजारे आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीपर्यंत, करुण नायरने एकूण 9 शतके झळकावली आहेत. करूण नायरची खेळी पाहून त्याला संघात मिळायला हवं अशी जोरदार आवाज उठला. वनडे संघात त्याची निवड झाली नाही. त्यामुळे निवड समितीवर जोरदार टीका झाली. पण आता इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याची निवड झाली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटीतून निवृत्ती जाहीर केल्यानंतर करुणला संघात स्थान मिळाले आहे. 2017 नंतर पहिल्यांदाच करुण नायरची कसोटी संघात निवड झाली आहे.

सहाव्या षटकात पहिली विकेट पडल्यानंतर करुण नायर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला.करुणने चौथ्या क्रमांकाचा फलंदाज सरफराज खानसोबत 181 धावांची भागीदारी करून भारत अ संघाला संकटातून बाहेर काढले. करूण नायर द्वीशतकाच्या उंबरठ्यावर आहे. भारत इंग्लंड यांच्यात 20 जूनपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. पण त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळेल की नाही हा प्रश्न कायम आहे. जर त्याला संधी दिली तर इंग्लंडमध्ये कर्णधार शुबमन गिल तिसऱ्या क्रमांकाऐवजी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेल अशी अपेक्षा आहे.