
वूमन्स टीम इंडिया हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात वर्ल्ड चॅम्पियन ठरली. भारताने अवघ्या काही दिवसांआधी अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत वनडे वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. त्यानंतर रविवारी 23 नोव्हेंबरला भारतीय महिला दृष्टीहीन संघाने इतिहास घडवला. दृष्टीहीन क्रिकेट संघाने नेपाळवर मात करत वर्ल्ड कप मिळवला. त्यानंतर आता क्रीडा विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. वूमन्स कबड्डी टीम इंडियाने अंतिम सामन्यात चीन तायपे संघाचा धुव्वा उडवला आहे. भारताने अंतिम सामन्यात 35-28 अशा फरकाने विजय मिळवत वर्ल्ड कप विजेता होण्याचा बहुमान मिळवला आहे. विशेष म्हणजे कबड्डी वूमन्स टीम इंडियाची वर्ल्ड कप जिंकण्याची ही सलग दुसरी वेळ ठरली आहे.
भारत विरुद्ध चीन तायपे यांच्यातील महामुकाबल्याचं आयोजन हे बांगलादेशची राजधानी ढाका इथे करण्यात आलं होतं. भारताच्या महिला ब्रिगेडने चीन तायपेवर 7 पॉइंट्सच्या फरकाने मात करत सलग दुसरा वर्ल्ड कप आपल्या नावावर केला. भारतीय महिला संघाचं या विजयानंतर सर्वच स्तरातून अभिनंदन केलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे. मोदींनी भारतीय महिला संघाचं फोटो पोस्ट करुन अभिनंदन केलं आहे.
चीन तायपेने टीम इंडिया विरुद्ध कडवट प्रतिकार केला. भारतानेही जशास तसं उत्तर दिलं. कॅप्टन रितू नेगी आणि उपकर्णधार पुष्पा राणा या दोघींनी रेड आणि टॅकल या दोन्ही आघाड्यांवर दबदबा कायम ठेवला. तर दुसऱ्या बाजूने संजू देवी हीने सुपर रेडद्वारे सामना भारताच्या बाजूने झुकवला. भारताने यासह वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली.
दरम्यान टीम इंडिया या स्पर्धेत अजिंक्य राहिली. भारताने साखळी फेरीतील 4 सामने जिंकले. भारताने साखळी फेरीत थायलंड, नेपाळ, बांगलादेश आणि युगांडाला लोळवलं. तर उपांत्य फेरीत भारताने इराणला पराभवाची धुळ चारली. तर अंतिम फेरीत पराभूत झाल्याने चीन तायपेला उपविजेता म्हणून समाधान मानावं लागलं.
भारताने या स्पर्धेतील पहिस्या सामन्यात थायलंडवर 51 पॉइंट्सच्या फरकाने धुव्वा उडवला. भारताने हा सामना 68-17 अशा फरकाने जिंकला.
भारताने आपल्या दुसऱ्या सामन्यात नेपाळला 50-12 ने लोळवलं.
बांगलादेश विरुद्ध भारताने 43-18 ने विजय साकारला.
युगांडावर 51-16 अशा फरकाने विजय मिळवला.
उपांत्य फेरीत इराणवर 33-21 ने मात करत अंतिम फेरीत धडक दिली.
अंतिम फेरीत चीन तायपेवर 35-28 ने विजय मिळवला.