भारत इंग्लंड मालिकेला आता अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीचं नाव, सचिनने स्पष्ट सांगितलं की…

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका 20 जूनपासून सुरु होत आहे. या ट्रॉफीला आता अँडरसन-तेंडुलकर असं नाव असेल. या दोन्ही दिग्गज खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवला आहे. यापूर्वी भारत-इंग्लंड कसोटी मालिका पतौडी कपने ओळखली जात होती.

भारत इंग्लंड मालिकेला आता अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीचं नाव,  सचिनने स्पष्ट सांगितलं की...
अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी
Image Credit source: BCCI
| Updated on: Jun 19, 2025 | 6:35 PM

भारत इंग्लंड कसोटी मालिकेच्या एक दिवस आधी या स्पर्धेच्या ट्रॉफीचं अनावरण करण्यात आलं. या दोन्ही देशाच्या कसोटी मालिकेला आता यापुढे अँडरसन-तेंडुलकर असं नाव असणार आहे. 19 जून रोजी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने या ट्रॉफीचं अनावरण केलं. यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसन उपस्थित होता. खरं तर 2007 पासून टीम इंडियाने इंग्लंड दौऱ्यात खेळलेल्या सर्व कसोटी मालिकांना पतौडी ट्रॉफी म्हणून ओळखलं जात होतं. आता या ट्रॉफीचं नाव बदलल्यानंतर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने आणखी एक निर्णय घेतला आहे. आता कसोटी मालिका जिंकणाऱ्या संघाच्या कर्णधाराला पतौडी मेडलने सन्मानित करण्यात येईल. जेम्स अँडरसनने या स्पर्धेच्या ट्रॉफी अनावरणावेळी सांगितलं की, मला आणि माझ्या कुटुंबियांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. दोन्ही देशात जेव्हा कधी कसोटी मालिका खेळली गेली तेव्हा त्याचा रोमांच पाहायला मिळाला आहे. मी आगामी मालिकेत इंग्लंड संघाची कामगिरी पाहण्यास खूपच उत्सुक आहे.

सचिन तेंडुलकरच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे. हे विक्रम मोडणं वाटतं तितकं सोपं नाही. या ट्रॉफीला त्याचं नाव दिल्यानंतर म्हणाला की, ‘कसोटी क्रिकेट माझ्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे. यात सर्वश्रेष्ठ कामगिरी करण्याचा प्रयत्न असतो. कसोटी क्रिकेटमध्ये संयमाची खरी परीक्षा असते. त्यात तुम्ही चांगली कामगिरी करू शकता. भारत आणि इंग्लंड या दोन्ही देशाच्या खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमध्ये मोठं योगदान दिलं आहे. येणाऱ्या पिढीसाठी ही प्रेरणा असणार आहे.’

सचिन तेंडुलकरने पुढे सांगितलं की, ‘मला माहिती आहे की बीसीसीआयने काही महिन्यांपूर्वीच पतौडी ट्रॉफी निवृत्त केली आहे. पण जेव्हा मला कळले की ती माझ्या आणि अँडरसनच्या नावावर ठेवण्यात येत आहे, तेव्हा मी प्रथम पतौडी कुटुंबाला फोन केला. टायगर पतौडी यांनी अनेक पिढ्यांना प्रेरणा देण्यात मोठी भूमिका बजावली आहे जी विसरता येणार नाही. पतौडी कुटुंब या मालिकेशी जोडलेले राहील कारण आता विजेत्या कर्णधाराला नवीन ‘पतौडी मेडल ऑफ एक्सलन्स’ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.’