बेन स्टोक्सने भारताविरूद्धच्या सामन्याआधीच मोठ्या फुशारक्या मारल्या, तशी काही भीती वाटत नाही पण…
भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु होण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. असं असताना या सामन्यापूर्वी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने फुशारक्या मारल्या आहेत. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहाबाबत त्याने मोठं वक्तव्य केलं आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामना हेडिंग्लेच्या लीड्स मैदानावर होत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेतील दोन्ही संघांचा हा पहिला सामना आहे. त्यामुळे या पर्वाची सुरुवात विजयाने करण्याचा दोन्ही संघांचा मानस आहे. यासाठी दोन्ही संघांनी रणनिती आखली आहे. या मालिकेत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची की प्लेयर ठरणार आहे. त्यामुळे टीम इंडिया त्याच्यासाठी वर्कलोड मॅनेजमेंट कसं करतेय हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. जसप्रीत बुमराहाने इंग्लंडविरुद्ध 9 कसोटी सामने खेळले आहेत. यातील 17 डावात त्याने गोलंदाजी केली आहे. यात 26.27 च्या सरासरीने 37 विकेट घेतल्या आहेत. यावेळी त्याने दोन वेळा पाच गडी बाद केले आहेत. असं असताना पहिला कसोटी सामना सुरु होण्यापूर्वी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सचं वक्तव्य समोर आलं आहे. त्याने सांगितलं की, जसप्रीत बुमराह एक वर्ल्ड क्लास गोलंदाज आहे, पण त्याचा सामना करण्यासाठी इंग्लंडचे फलंदाज पूर्णपणे तयार आहेत.
इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने स्काय स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, एक गोलंदाज कोणत्याही संघाला मालिका जिंकवून देऊ शकत नाही. जसप्रीत बुमराहबाबत आमच्या संघातील फलंदाजांना कोणतीही भीती नाही. कोणत्याही संघाला कसोटी विजय मिळवायचा असेल तर सर्व 11 खेळाडूंना चांगली कामगिरी करणं आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुम्ही कायम चांगल्या संघांविरुद्ध खेळता. आम्हाला बुमराहचा क्लास माहिती आहे. जो ज्या संघासाठी खेळतो त्यासाठी काय आणतो हे माहिती आहे. पण भीती अजिबात नाही.
जसप्रीत बुमराह प्लेइंग इलेव्हन असायला हवा असं प्रत्येक भारतीय क्रिकेटप्रेमींना वाटते. पण तसं आता शक्य असेल असं नाही. कारण गेल्या काही वर्षात जसप्रीत बुमराहला पाठदुखीच्या त्रासाने ग्रासलं आहे. त्यामुळे त्याच्याबाबत वर्कलोड मॅनेजमेंट करणं आवश्यक आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या पाचही कसोटी सामन्यात खेळणं कठीण आहे. त्यामुळे पहिल्या कसोटी सामन्यात खेळणार की नाही येथून प्रश्न आहे. पहिल्या कसोटी सामन्यात पावसाची शक्यता पाहता हा सामना ड्रॉ होऊ शकतो. त्यामुळे पहिल्या कसोटीसाठी जसप्रीत बुमराहला आराम दिला जाऊ शकतो.
