
मुंबई: आशिया कप (Asia cup) स्पर्धा अवघ्या दोन दिवसांवर आली आहे. विविध देशांचे माजी क्रिकेटपटू या स्पर्धेबद्दल आपआपला अंदाज वर्तवतायत. आता न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू स्कॉट स्टायरिस (Scott Styris) यांनी भारताबद्दल एक मोठं विधान केलय. स्कॉट स्टायरिस हे न्यूझीलंडचे (Newzeland) माजी ऑलराऊंडर आहेत. आशिया चषक स्पर्धेत भारतामध्ये पाकिस्तानसह सर्व संघाना चिरडण्याची क्षमता आहे, असं स्टायरिस यांनी म्हटलं आहे. आशिया कप स्पर्धा 27 ऑगस्टपासून सुरु होतेय. भारताचा पहिला सामना 28 ऑगस्टला पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. ही लढत म्हणजे फायनल आधीची रंगीत तालीम असेल, असं अनेक क्रिकेट पंडितांचं मत आहे.
आशिया कप स्पर्धेत खेळताना भारतीय संघाची विचारसरणी आणि प्रवृत्ती कशी असली पाहिजे? यावर स्कॉट स्टायरिसने स्पोर्ट्स 18 च्या कार्यक्रमात भाष्य केलं. भारतीय खेळाडूंना जी स्टाइल मानवते, त्याचा अवलंब भारतीय संघाने मागच्या टी 20 वर्ल्ड कप मध्ये केला नाही, असं स्टायरिस यांनी म्हटलं.
रोहित शर्मा आणि त्याच्या टीमला दुसऱ्या संघांवर वर्चस्व गाजवताना मला पहायचं आहे. पाकिस्तानसह स्पर्धेतील सर्वच संघांना चिरडण्याची क्षमता टीम इंडिया मध्ये आहे, असा दावा स्कॉट स्टायरिस यांनी केला. भारतीय संघाने या टुर्नामेंट मध्ये खेळताना एक वेगळा जोश दाखवला पाहिजे. खूप सामान्यपणे स्पर्धेत खेळू नये, असं स्टायरिसने म्हटलं आहे.
“भारताकडे टी 20 मध्ये मजबूत संघ आहे. त्यांनी एकत्र येऊन त्यांच्या खेळाडूंना सूट होईल, अशा प्रकारचं उत्तम क्रिकेट खेळावं. मागच्या टी 20 वर्ल्ड कप मध्ये भारतीय संघ अशा प्रकारच क्रिकेट खेळला नाही. भारतीय संघाकडे प्रतिभा आणि कौशल्य आहे. आशिया कप मध्ये मला भारतीय संघाला प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व गाजवताना पहायचं आहे. त्यांच्याकडे ती क्षमता आहे” अशा शब्दात स्कॉट स्टायरिसने भारतीय संघाचं कौतुक केलं.